दांडेगाव कर यांच्या निवडीमुळे देशातील साखर उद्योगाला चांगले दिवस .राजेश टोपे

दांडेगावकर यांच्या निवडीमुळे देशातील साखर उद्योगाला चांगले दिवस येणार : आरोग्य मंत्री राजेश टोपे
हिंगोली:महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या जयप्रकाश दांडेगावकर यांच्या राष्ट्रीय साखर संघाच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीमुळे देशातील साखर उद्योगाला चांगले दिवस येतील असा विश्वास आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी ता. एक हिंगोली येथे व्यक्त केला.
हिंगोली येथील शिवलीला लॉन्स च्या परिसरात आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, आमदार सतीश चव्हाण, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार राजेश नवघरे, माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आरोग्य मंत्री टोपे पुढे म्हणाले की, जयप्रकाश दांडेगावकर हे आपल्यासाठी पितृतुल्य व्यक्तिमत्व आहे. त्यांनी सहकार मंत्री म्हणून काम करताना  हिंगोली जिल्ह्यात तसेचमतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केली. त्यानंतर पूर्णा कारखाना यशस्वीपणे चालवून दाखवला आहे. राज्य साखर संघाचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सोबतच कारखानदारांना देखील न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची कामाची हातोटी लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्यावर दिल्ली येथे राष्ट्रीय साखर महासंघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाकडे राष्ट्रीय साखर महासंघाची जबाबदारी आल्यामुळे आता देशातील साखर कारखान्यांना चांगले दिवस येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात तसेच देशामध्ये उसाचे उत्पादन क्षमतेपेक्षा अधिक झाले असून अधिकचा झालेला ऊस कसा गाळप करावा याबाबत योग्य निर्णय ते घेतीलच. देशात उसाऐवजी बीटपासून साखर निर्मिती करण्याबाबत त्यांनी विदेश दौराही केला आहे. त्यामुळे पुढील काळात देशात उसा सोबतच बीट पासूनही साखरेचे उत्पादन होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. सहकार मंत्री असताना त्यांनी घेतलेले योग्य निर्णय आजही साखर कारखानदारीसाठी तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे ठरले आहेत. भविष्यात देशातील साखर कारखानदारीला चांगले दिवस येतील असा विश्वासही टोपे यांनी व्यक्त केला.
राज्यात तरुणांनी नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे व्हावे असे आवाहन त्यांनी केले. नवीन व्यवसाय उभारण्याचा दृष्टिकोन तरुणांमध्ये असला पाहिजे. व्यवसायाला महत्त्व देऊन तरुणांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. हिंगोली येथील शासकीय रुग्णालयाला एम आर आय मशीन देऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. याशिवाय हिंगोली जिल्ह्यातील रिक्त जागा भरल्या जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सत्कार मूर्ती जयप्रकाश दांडेगावकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की आपण सत्कार स्वीकारण्यापेक्षा संधी मिळाल्या तर सत्कार्य करण्याचे प्रयत्न करत असतो. हिंगोली जिल्ह्याने ओळख दिल्यामुळे महाराष्ट्रात साखर संघाचे अध्यक्ष होता आले. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राने ओळख दिल्याने आता दिल्लीत राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष होत आले. पुढील काळात सर्वांना सोबत घेऊन हिंगोली जिल्ह्याचा ना उद्योग जिल्हा हा ठसा मिटविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे  त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या कामाचे कौतुक केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने