दिड हजार लोकांची गर्दी केल्याने मंगल कार्यालयाच्या मालकावर गुन्हा
50 हजार रुपयाचा दंड लावण्यात येणार, वऱ्हाडी मंडळीची उडाली धांदल
हिंगोली/प्रतिनिधी
विवाह सोहळ्यात किमान 50 लोकांना परवानगी दिली असताना गुरुवारी (ता.25) शहरात पार पडलेल्या साई मंगल कार्यालयात दीड हजार लोकांनी गर्दी केल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पथकाने साई मंगल कार्यालयाच्या मालकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील खटकाळी परिसरातील हनुमान नगर येथे गुरुवारी तारे व दौड परिवारात विवाह सोहळा साजरा झाला. विवाह सोहळ्याला 50 लोकांना जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली असताना या साई मंगल कार्यालयाने जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने पालिका व शहर पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी साई मंगल कार्यालयाच्या मालकावर गर्दी केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना विषाणू पाय पसरत असताना जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक पावले उचलत रात्रीची संचारबंदी जारी केली आहे. तसेच विवाह सोहळे साजरे करण्यासाठी मंगल कार्यालयात न करता खुल्या मैदानात करावे तसेच 50 लोकांनाच बंधनकारक करण्याचे असे आदेश मंगल कार्यालयांना दिले असताना देखील साई मंगल कार्यालयाने आदेशाचे उल्लंघन करीत मंगल कार्यालयात गर्दी जमा झाल्याने त्यांच्यावर कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे. तसेच 50 हजाराचा दंड देखील लावला जाणार असल्याचे पथकाने सांगितले. कारवाई केलेल्या पथकात पोलिस निरीक्षक पंडित कछवे, यांच्यासह पालिकेचे संदीप मस्के, प्रवीण चव्हाण, डी. पी. शिंदे, पी. बी. ठाकूर, आदींचा समावेश होता.
टिप्पणी पोस्ट करा