डिजेच्या तालावर नाचण्यावरुन वाद, तलवारीने मारहाण
तळणी येथील घटना, वराडाकडील चारजण गंभीर जखमी
हिंगोली (प्रतिनिधी)- सेनगाव तालुक्यातील तळणी या ठिकाणी विवाह सोहळ्याची अंतिम तयारी सुरू असताना नवरदेवाच्या वरातीमध्ये डीजेच्या तालावर नाचण्याच्या कारणावरून झालेला शाब्दिक वाद विकोपाला गेल्यानंतर वादाचे रूपांतर तलवारीने हाणामारीत झाल्याने यामध्ये वराकडील चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि.२८ एप्रिल रोजी घडली आहे.
सेनगाव तालुक्यातील तळणी येथील मुलीचे लग्न सापटगाव येथील मुलाशी जुळले होते वधू पित्याकडून विवाह सोहळ्याची सर्व तयारी करण्यात आली होती. दुपारी १ च्या सुमारास तळणी येथील आंबेडकर भवन येथे लग्न सोहळा पार पडणार होता. वधू पक्षाकडून लग्न सोहळा वेळेवर लावण्याचा आग्रह होता. मात्र नवरदेवाची वरात काढण्यात आल्याने वराकडील मंडळी डीजेच्या तालावर नाचण्यात व्यस्त झाली होती. वधूपक्षाकडून अनेकदा विनवणी करण्यात आली. मात्र वराकडील मंडळींनी याकडे दुर्लक्ष केले यामुळे शाब्दिक वाद उद्भवला व त्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले वाद विकोपाला गेल्यानंतर काहींनी चक्क तलवारी काढल्या होत्या तर वर्हाडी मंडळींनी सुद्धा घरावर दगडफेक केली यामध्ये वराकडील चार ते पाच जण जखमी झाले होते जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले.
सदरील घटनेची माहिती मिळताच नर्सी पोलीस ठाण्याचे सपोनि सुनील गिरी, पोउपनि अशोक कांबळे हे घटनास्थळी दाखल झाले होते. फिर्यादी रवी नाथाराव वाकळे रा. सापडगाव ता.सेनगाव यांच्या फिर्यादीवरून राजू खंदारे, अमोल खंदारे, रा.तळणी ता. सेनगाव यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये नर्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या होत असलेल्या विवाह सोहळ्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाला देण्यात आली महिला बालकल्याण विभागाच्या पथकाने सखोल चौकशी केली असता सदरील वधू ही अल्पवयीन असल्याचे उघड झाल्याने वधूच्या आई वडीलाचे समुपदेशन करून हा विवाह सोहळा रोखण्यात यश आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा