कायदा व सुव्यवस्था मोडीत काढणाऱ्यावर कारवाई करा
अप्पर पोलीस अधीक्षक काळे यांचे अधिकाऱ्यांना आदेश
हिंगोली
तीन मे रोजी मुस्लिम बांधवाचा रमजान ईद उत्सव व हिंदू बांधवांचे देखील उत्सव आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सक्त आदेश अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी दिले आहेत.
येथील शहर पोलीस ठाण्यात आगामी सण ,उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शांतता समितीची बैठक बोलावण्यात आली. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे , सय्यद ,आदींची उपस्थिती होती.
मुस्लिम बांधवांचा रमजान महीना सुरू असून (ता.३) मे रोजी रमजान ईद साजरी केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर यदाकदाचित कायदा व सुव्यवस्था कोणी मोडीत काढत असेल तर त्यावर सक्त कारवाई करण्याचे आदेश काळे यांनी शांतता समितीच्या बैठकीत दिले आहेत. आगामी येणारे सण उत्सव सर्वधर्मसमभाव पाळत साजरे करावेत ,कुठेही गालबोट लागू नये याची खबरदारी सर्वांनी घ्यावी असे आवाहन करण्यात आले. यावेळी बैठकीला मधुकर मांजमरकर, सुभाष लदनिया, केशव दुबे, शेख नईम शेख लाल, खलील बेलदार, मुफ्ती रहेमान यांच्यासह मौलाना व सर्व समाजातील समाज बांधव उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा