चोरीच्या मार्गाने विक्रीसाठी आणलेले 30 क्विंटल स्वस्त धान्य पोलिसांनी केले जप्त
हिंगोली प्रतिनिधी
16मे 2022
कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव परिसरातून काळ्याबाजारात दुकानातून विक्रीसाठी आणलेले स्वस्त धान्य 30 क्विंटल रामेश्वर तांडा येथील गावकरी व आखाडा बाळापूर पोलिसांनी रविवारी ता. 15 रात्री पकडले. दरम्यान पोलिसांनी धान्य वाहतूक करणारा टेम्पो जप्त केला आहे. या प्रकरणात अधिक चौकशी सुरू करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव परिसरातून एका आयशर टेम्पो मध्ये स्वस्त धान्य दुकानातील सुमारे 30 क्विंटल धान्य भरून काळ्याबाजारात विक्रीसाठी नेले जात होते. रविवारी रात्रीच्या सुमारास हा टेम्पो दांडेगाव परिसरातून रामेश्वर तांडा मार्गे निघाला होता. या बाबतची कुणकुण रामेश्वरतांडा येथील गावकऱ्यांना लागल्यानंतर गावकऱ्यांनी टेम्पोवर पाळख ठेवली. रात्री 11.00 वाजण्याच्या सुमारास टेम्पो रामेश्वरतांडा गावाजवळ आला असताना गावकऱ्यांनी टेम्पो अडवून ठेवला. गावकऱ्यांनी टेम्पो चालकाकडे विचारणा केली असता चालकाची बोबडीच वळली. त्यानंतर या घटनेची माहिती आखाडा बाळापुर पोलिसांना देण्यात आली.
याबाबतची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राकेश कलासागर सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आखाडा बाळापुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार जाधव, जमादार मुलगीर, मधुकर नागरे यांच्या पथकाने तातडीने रामेश्वरतांडा येथे धाव घेतली. पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये गहू व तांदळाची पोते आढळून आली. पोलिसांनी सदर टेम्पो जप्त करून आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यात उभा केला आहे.
या प्रकरणात आता आज तहसील कार्यालयास पत्र दिले जाणार असून गहू व तांदळाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा