आजेगाव येथील खूनप्रकरणी एकास जन्मठेपेची शिक्षा
महाराष्ट्र 24 न्यूज
नेटवर्क
हिंगोली : खूनप्रकणात एका आरोपीस दोषी ठरवत जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. व्ही. बुलबुले यांनी १८ ऑक्टोबरला सुनावला.
सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे भांडण का सोडविले या कारणावरून २८ मे २०१६ रोजी रात्री ९.१५ च्या सुमारास नंदकिशोर रामभाऊ काळे, अनिकेत शिवलिंग क्षीरसागर व अन्य एकास लोखंडी कुऱ्हाड व गजाळीने मारहाण करण्यात आली. अन्य काही जणांनी लाकूड, काठी, राप्टर, पाईपने मारहाण करून जखमी केले. त्यातील जखमींना उपचारासाठी प्रारंभी हिंगोली व त्यानंतर नांदेड येथे खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यातील जखमी अनिकेत शिवलिंग क्षीरसागर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना औरंगाबाद येथील खासगी दवाखान्यात रेफर करण्यात
आले. मात्र, ३१ मे २०१६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नंदकिशोर रामभाऊ काळे (रा. आजेगाव) यांच्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर प्रकाश कऱ्हाळे, सतीश प्रकाश कऱ्हाळे, दादाराव गणपत कऱ्हाळे, दिलीप गोविंद काळे, निखिल दादाराव कऱ्हाळे, गजानन केशव हजारे, योगेश रमेश कन्हाळे याचेविरूद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. सहायक पोलीस निरीक्षक आर. एस. सोनवणे व पोलीस उपनिरीक्षक चिलांगे यांनी तपास करून सत्र न्यायालय हिंगोली येथे दोषारोपपत्र दाखल केले होते. हे प्रकरण अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. व्ही. बुलबुले
यांच्यासमोर चालले. सरकार पक्षातर्फे एकूण २३ साक्षीदार तपासण्यात आले. १८ ऑक्टोबरला अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. व्ही. बुलबुले यांनी दोन्ही, पक्षाचा युक्तिवाद ऐकून आरोपी ज्ञानेश्वर प्रकाश कन्हाळे (रा. आजेगाव) यास कलम ३०२ भा.दं.वि. नुसार दोषी ठरवत सश्रम कारावासासह जन्मठेपेची शिक्षा व ५ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास दोन महिना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली तसेच कलम ३०७ भा.दं.वि. अन्वये दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व २ हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. इतर आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले. सरकार पक्षातर्फे जिल्हा सहायक सरकारी वकील एन. एस. मुटकुळे यांनी बाजू मांडली. त्यांना सहा. सरकारी वकील एस. डी. कुदें एस.एस. देशमुख यांनी सहाय्य केले.. कोर्ट पैरवी पोलीस कॉन्स्टेबल पी.एस. मारकड यांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा