हिंगोलीत भारत जोडो यात्रेत झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेत चोरटच्यांनी चांगलेच हातसाफ करून घेतले. या गर्दीत चोरट्यांनी 10पेक्षा अधिक कार्यकर्त्यांच्या खिशाला कात्री लाऊन तब्बल 75 हजार रुपये पळविले. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 14 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे.
काँग्रेस खासदार राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा सोमवारी हिंगोली शहरात दाखल झाली. यावेळी हिंगोली तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह बाहेर जिल्हयातील कार्यकर्ते व पदाधिकारी उत्साहाने सहभागी झाले होते. त्यामुळे यात्रेमध्ये मोठी गर्दी झाली होती. या गर्दीत चोरट्यांनी घुसखोरी करून अनेकांचे खिसे साफ केले. गर्दीत ढकला ढकली करून त्यांनी कार्यकर्त्यांच्या शिखालाच कात्री लावली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपार नंतर सुमारे 10 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांचे खिसे साफ झाले आहेत.
दरम्यान या यात्रे मध्ये वसमत येथील सय्यद इम्रानअली दाखल झाले होते. त्यांच्या खिशातील रोख रक्कम असलेले पाकीट चोरट्यांनी लांबविले. त्यानंतर त्यातील पैसे काढून घेऊन पाकिट फेकून दिले. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी रात्री उशीरा हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानंतर काही वेळातच अन्य चार ते पाच कार्यकर्ते देखील तक्रारी दाखल करण्यासाठी आले होते. पोलिसांनी सर्वांची एकच तक्रार नोंदवून घेतली. यामध्ये सय्यद इम्रान अली यांच्यासह अन्य चार ते पाच जणांचे ७५ हजार रुपये पळविल्याचे नमुद केले आहे. यावरून पोलिसांनी चोरट्यां विरुध्द हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान कोल्हापूर व इतर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचेही पैसे पळविण्यात आले. मात्र पोलिसांची चौकशी अन वेळोवेळी हिंगोलीत यावे लागेल यामुळे त्यांनी तक्रार देण्याचे टाळल्याचेही पोलिस सुत्रांनी सांगितले.
पाच संशयीत गुन्हे शाखेच्या ताब्यात
या प्रकरणानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, शिवसांब घेवारे, सुनील गोपीनवार यांच्या पथकाने पाच संशयीतांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा