शेत जमिनीत वाटा नको म्हणून सख्या भावाचा काढला काटा
शेगाव खोडके येथील खून प्रकरण दोघा आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
16 डिसेंबर 2024
हिंगोली जिल्ह्यातील शेगाव खोडके येथील सख्या भावाचा खून करून मृतदेह शेतात पुरल्याची घटना १४ डिसेंबर रोजी सेनगाव तालुक्यातील शेगाव (खोडके) येथे उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, शेत जमिनीत वाटेकरी नको म्हणून सख्या भावाचा काटा काढल्याचे समोर आले आहे. दरम्यान, दोघाही आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक विनोद झळके यांनी दिली.
शेगाव (खोडके) येथील शिवाजी किसन खोडके (२२) याचा खून करून मृतदेह शेतात पुरल्याची खळबळजनक घटना पुढे आली. याप्रकरणी नारायण नामदेव खोडके (रा.शेगाव खोडके) यांच्या फिर्यादीवरून हरिभाऊ किसन खोडके व पवन धोंडू आखाडे (दोघे रा.शेगाव खोडके) यांच्या विरूद्ध १५ डिसेंबर रोजी गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. याप्रकरणात मयत शिवाजीचा सख्खा मोठा भाऊ हरिभाऊ किसन खोडके यास पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली. यात त्याने सर्व शेतजमीन आपल्यालाच मिळावी व सततच आपमान करतो म्हणून पवन धोंडू आखाडे (रा.शेगाव खोडके) यांच्या मदतीने गळा आवळून पवन आखाडे यांच्याच शेतात खून केला. त्यानंतर मृतदेह शेतातील आढ्यात बांबूच्या झाडाजवळ खड्डा करून पुरल्याची कबुली दिली.
दरम्यान, पोलिसांनी दोन्ही आरोपींना सेनगाव न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विनोद झळके करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा