पारडी पोहकर शिवारात वीज पडून महिलेचा मृत्यू

पारडी  पोहकर शिवारात वीज पडून महिलेचा मृत्यू

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
18मे2025
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील पारडी
पोहकर शिवारात वीज पडून एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना १७ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. मुक्ताबाई रामजी गिरी (४०, रा. पार्डी पोहकर ता. सेनगाव) असे मयत महिलेचे नाव आहे.
मुक्ताबाई गिरी या पार्टी पोहकर शिवारातील शेतात काम करीत होत्या. या भागात दुपारी ४ वाजेच्या सुमारास वादळीवारा सुटला आणि मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. याच दरम्यान मुक्ताबाई गिरी यांच्या अंगावर वीज पडली. आजुबाजुच्या शेतकऱ्यांनी मुक्ताबाई यांना सेनगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषीत केले.

त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, चार मुली असा परिवार आहे. मुक्ताबाई गिरी यांच्या मृत्यूने पार्डी गावात शोककळा पसरली आहे.

सात शेळ्या दगावल्या...

सेनगाव तालुक्यातील गुगुळ पिंपरी शिवारात वीज पडून सात शेळ्या दगावल्याची घटना १७ मे रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास घडली.

अमोल भगवान इंगोले (रा. गुगुळ पिंपरी ता. सेनगाव) यांनी नेहमीप्रमाणे शेतशिवारात शेळ्या चारण्यासाठी नेल्या होत्या. दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. यादरम्यान त्यांनी कडूजी पुंजाजी तायडे यांच्या शेतात असलेल्या आंब्याच्या झाडाखाली शेळ्या थांबविल्या. यादरम्यान आंब्याच्या झाडावर वीज कोसळल्याने सात शेळ्यांचा मृत्यू झाला. तसेच आंब्याच्या झाडाचेही नुकसान झाले. सुदैवाने शेळीपालकाला इजा झाली नाही. या घटनेची माहिती महसूल विभागाला देण्यात आल्याची माहिती शेतकऱ्याने दिली.

दरम्यान, सेनगाव तालुक्यातीलच भगवती येथे वीज पडून एक बैल दगावल्याची माहिती आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने