हिंगोली मिनी मंत्रालयासमोर अति पावसामुळे मुख्य प्रवेशद्वार जलमय

हिंगोली मिनी मंत्रालयासमोर अति पावसामुळे मुख्य प्रवेशद्वार जलमय

वाहनचालक व नागरिकांची तारेवरची कसरत; प्रशासनाचे दुर्लक्ष ठपका

हिंगोली | प्रतिनिधी

15 सप्टेंबर 2025

हिंगोली शहरात गेल्या काही तासांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मिनी मंत्रालयासमोरील परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. विशेषतः मुख्य प्रवेशद्वाराजवळ साचलेल्या पाण्यामुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सामान्य नागरिकांचे हाल सुरूच आहेत.

पावसाचे पाणी निचऱ्याच्या व्यवस्थेअभावी थेट प्रवेशद्वारापर्यंत साचले असून, सकाळपासूनच कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांसह कामासाठी येणाऱ्या नागरिकांची चिखल व पाण्यातून वाट काढत कसाबसा प्रवेश करण्याची धडपड सुरू आहे. काही वाहनचालकांच्या दुचाकी थेट पाण्यात बंद पडल्याचेही चित्र दिसून आले.

स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही या भागातील जलनिकासी समस्येचा मुद्दा उपस्थित केला होता, मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. "दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते. अधिकारी पाहणी करून जातात, पण प्रत्यक्षात काहीच बदल होत नाही," अशी संतप्त प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकाने व्यक्त केली.

प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नसली, तरी अशा प्रकारे महत्त्वाच्या शासकीय इमारतीसमोरच जर पाणी साचत असेल, तर शहरातील इतर भागांची अवस्था काय असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


कृषी, , समाजकल्याण, महिला बालविकास यांसारख्या विविध शासकीय कार्यालयांसाठी येणाऱ्या नागरिकांची होणारी गैरसोय तातडीने दूर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने