सचिन गायकवाड यांना पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
दिनांक : 17 सप्टेंबर 2025
हिंगोली जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात झळाळता दीप ठरलेले शिक्षक सचिन राजाबाई लिंबराज गायकवाड यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरणीय व राष्ट्रीय कार्याबद्दल ‘आदर्श जिल्हा शिक्षक पुरस्कार’ देण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार समारंभात हिंगोलीचे आमदार श्री तानाजीराव मुटकुळे, माजी आमदार श्री रामराव वडकुते, जिल्हाधिकारी श्री राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली रमेश, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुधीर ठोंबरे, श्री नामदेव केंद्रे, शिक्षणाधिकारी श्री प्रशांत दिग्रसकर, श्री संदीप सोनटक्के, उपशिक्षणाधिकारी श्रीमती असावरी काळे, डायट प्राचार्य श्री भानुदास पुटवाड यांच्यासह इतर मान्यवर, शिक्षण विभागातील अधिकारी व विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षण व समाजसेवेतील उल्लेखनीय वाटचाल
सचिन गायकवाड यांची प्रथम नेमणूक 2003 मध्ये टाकळगव्हाण येथील शाळेत झाली. शिक्षण क्षेत्रात पदार्पण करताच त्यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार व संस्कारयुक्त शिक्षण देण्याचा ध्यास घेतला. शाळेचा परिसर सौंदर्यीकरण, रंगरंगोटी, स्वच्छता व निर्मलग्राम योजनेत टाकळगव्हाण ग्रामपंचायतीस विभागीय निर्मलग्राम पुरस्कार मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
महात्मा गांधी तंटामुक्त अभियानात विशेष सहभाग घेत गावाला तंटामुक्ती पुरस्कार मिळवून दिला. 1000 रोपांची रोपवाटिका तयार करून विद्यार्थ्यांच्या सहभागातून वृक्षारोपण करून आजही ती झाडे सजीव ठेवण्यात आली आहेत.
वगरवाडीतील पर्यावरण व जलसंधारण कार्य
2013 मध्ये वगरवाडी येथे स्थानांतर झाल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांच्या साहाय्याने दोन वनराई बंधारे, शिक्षक संघटनेच्या माध्यमातून एक वनराई बंधारा बांधला. याची दखल घेत पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार जयप्रकाश दांडेगावकर यांनी गावाला दोन सिमेंट बंधारे मंजूर केले.
वगरवाडीला स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्त गाव बनवण्यातही त्यांनी मोलाचे योगदान दिले. यासाठी तत्कालीन सीईओ श्री राहुल रेखावार यांनी त्यांचा सन्मान केला. कृषी मार्गदर्शन शिबिर, नेत्रहीन संस्थेसाठी निधी संकलन, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रतिनिधित्व, अशा अनेक कार्यांद्वारे त्यांनी समाज व शिक्षण क्षेत्रात वेगळी छाप पाडली आहे.
अंजनवाडी व पूरजळ येथे नाविन्यपूर्ण उपक्रम
अंजनवाडी येथे कार्यरत असताना त्यांनी भारत स्काऊट गाईडच्या माध्यमातून आँढा नागनाथ मंदिर परिसरात स्वच्छता मोहिम, भाविक सेवा, कचरा व्यवस्थापन असे उपक्रम राबवले. शैक्षणिक सहली, डिजिटल शाळा, इन्स्पायर अवॉर्ड अंतर्गत विज्ञान प्रदर्शन, कुटुंब नियोजन जनजागृती, शिक्षण वारी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला.
पूरजळ येथील कार्यकाळात त्यांनी आनंददायी शनिवार, दप्तरमुक्त शनिवार, कला, क्रिडा व गोष्टींच्या माध्यमातून अध्यापन यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. माझी शाळा टप्पा क्र. 2 – सुंदर शाळा उपक्रमात तालुकास्तरीय तृतीय क्रमांकाचे बक्षीस (₹1 लाख रोख) मिळवून देण्यात त्यांच्या प्रयत्नांचे मोठे योगदान आहे.
शिष्यवृत्ती, सामाजिक कार्य आणि प्रोत्साहन
NMMS, स्कॉलरशिप परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यश मिळवून दिले. बीएलओ म्हणून काम करताना मतदार नोंदणीत विशेष योगदान, साक्षर भारत अभियान, जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळावे, आणि 3.05 लाख रुपयांचा लोकसहभाग शाळेसाठी उभारणे, ही त्यांची कामगिरी समाजसेवेतून शिक्षणाच्या मजबूत पायाभरणीचे द्योतक आहे.
राष्ट्रीय पातळीवरील योगदान व विद्यार्थी प्रगती
PM ई-विद्या साठी व्हिडीओ निर्मिती, तंबाखूमुक्त शाळा अभियान, तसेच त्यांच्या विद्यार्थ्यांपैकी अनेकजण आज डॉक्टर, वकील, शिक्षक, पत्रकार, परदेशातील कर्मचारी, भारतीय सैन्यात कार्यरत असून, ते आजही आपल्या गुरूंच्या संपर्कात आहेत ही गोष्ट त्यांच्या प्रभावशाली शिक्षणपद्धतीची साक्ष देते
पुरस्कार आणि गौरव
सचिन गायकवाड सरांच्या कार्याची दखल घेत हिंगोली जिल्हा परिषद व शिक्षण विभागामार्फत त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला.
या गौरवप्रसंगी शिक्षण विभागातील अधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि सहकारी शिक्षकांनी उपस्थित राहून त्यांच्या कार्यास सलाम केला.
सचिन गायकवाड सर हे शिक्षकी पेशाचे खरे अध्वर्यू असून, त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात अमूल्य संस्कार व ज्ञानाचे बीज रोवले आहे.
त्यांचे कार्य आजच्या शिक्षकवर्गासाठी प्रेरणास्थान आहे.
टिप्पणी पोस्ट करा