तरुणाच्या कमरेला ‘खंजीर’
हिंगोली पोलिसांची बेधडक कारवाई
Maharashtra 24 News
05ऑक्टोबर 2025
हिंगोली जिल्ह्यात पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू केली असून, नुकत्याच एका बेधडक कारवाईत तरुणाच्या कमरेला खंजीर आढळून आला. हा प्रकार पोलिसांनी सोशल मीडियावर लक्ष ठेवून उघडकीस आणला असून, संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
नेमकं काय घडलं?
पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण हद्दीत कुंडलिक उर्फ सचिन त्र्यंबक कुंडकर (वय 25), रा. कुंडकर पिंपरी, ता. औंढा, जि. हिंगोली हा तरुण दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने आपल्या कमरेला खंजीर लावून फिरत असल्याची माहिती पोलिसांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली.
त्यावरून तातडीने कारवाई करत पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडील खंजीर जप्त केला. याप्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 नुसार हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाची ठोस भूमिका
या कारवाईमुळे हिंगोली जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. हिंगोली पोलिसांकडून अवैध शस्त्र धारण करणाऱ्यांवर सतत गुप्त माहिती मिळवून तसेच सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवून कारवाई करण्यात येत आहे.
ही कारवाई कोणी केली?
सदर कारवाई पुढील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:
श्री. श्रीकृष्ण कोकाटे – पोलीस अधीक्षक, हिंगोली
श्री. कमलेश मीना – अपर पोलीस अधीक्षक, हिंगोली
श्री. मोहन भोसले – पोलीस निरीक्षक, स्थानीक गुन्हे शाखा
श्री. शिवसांब घेवारे – सहाय्यक पोलीस निरीक्षक, स्थानीक गुन्हे शाखा
तर प्रत्यक्ष कारवाईचे नेतृत्व श्री. डी. आर. मोरे (पोलीस उपनिरीक्षक, स्थानीक गुन्हे शाखा) यांनी केलं. त्यांच्या पथकात पोह. बालाजी मुंडे, पोह. निरंजन नलवार, पोह. संदीप जाधव, पोशी धनंजय क्षीरसागर यांचा समावेश होता.
अवैध शस्त्र धारकांना इशारा
या घटनेच्या पार्श्वभूमीवर हिंगोली पोलिसांनी जिल्ह्यातील नागरिकांना आणि तरुणांना इशारा दिला आहे की, कोणताही शस्त्र परवाना नसताना हत्यार बाळगणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकरणांवर पोलिसांकडून शून्य सहिष्णुतेच्या धोरणानुसार कठोर कारवाई केली जाणार आहे.
आरोपीचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम कुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुधीर ठोंबरे करीत आहेत
टिप्पणी पोस्ट करा