कंत्राटदाराच्या निवासस्थानी सुपरवायझरने मारला डल्ला; २ लाख रुपयांची रोकड गायब
महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क
13 ऑक्टोंबर 2025
हिंगोली शहरातील भट्ट कॉलनी परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. कंत्राटदाराच्या निवासस्थानी काम करणाऱ्या सुपरवायझरनेच घरात डल्ला मारून तब्बल २ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भट्ट कॉलनीतील प्रदीप दगडूलाल सोनी हे कंत्राटदार असून, ३ ऑक्टोबर रोजी ते आपल्या कुटुंबासह पुणे येथे बाहेरगावी गेले होते. त्यांच्या गैरहजेरीत घराची देखरेख करण्याची जबाबदारी सुपरवायझर पांडुरंग विठ्ठल क्षिरसागर (रा. पारोळा, ह. मु. हातमाली) याच्यावर होती. तसेच सोनी कुटुंबाने घराची स्वच्छता व कपडे धुण्याचे काम करणाऱ्या सिद्धार्थ कॉलनीतील महिलेला घर सांभाळण्यासाठी नेमले होते.
६ ऑक्टोबर रोजी प्रदीप सोनी हे हिंगोलीला परतले आणि काही दिवसांनी, ९ ऑक्टोबर रोजी, त्यांनी कपाटातील रोकड तपासणी केली असता ५०० रुपयांच्या ४०० नोटा, म्हणजेच एकूण २ लाख रुपये, गायब असल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे घराचा कडीकोट सुस्थितीत होता आणि कुलूपाची चावी हॉलमधील अलमारीतच अडकवलेली होती. ही बाब केवळ सुपरवायझर पांडुरंग क्षिरसागर याला माहीत होती.
या संशयावरून प्रदीप सोनी यांनी ११ ऑक्टोबर रोजी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली, त्यानुसार सुपरवायझर पांडुरंग क्षिरसागर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एम. परगेवार करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा