शेतकऱ्याच्या झेंडू फुलाला भाव कवडीमोल, फटाक्याचे भाव तेजीत – शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात

शेतकऱ्याच्या झेंडू फुलाला भाव कवडीमोल, फटाक्याचे भाव तेजीत – शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
22ऑक्टोबर 
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा, उत्सवांचा सण. पण या सणात जिथे व्यापाऱ्यांची घरं फटाक्यांच्या प्रकाशाने उजळून निघतात, तिथे दुसरीकडे शेतकऱ्यांच्या घरात मात्र अंधाराचे सावट पसरले आहे. कारण झेंडूच्या फुलाला यंदा कवडीमोल भाव मिळत असून फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे गणित पूर्णपणे बिघडले आहे.
दिवाळीच्या सणात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. पूजेसाठी, सजावटीसाठी झेंडूला बाजारात चांगला उठाव असतो. मात्र यंदा दर खूपच घसरले असून बहुतांश बाजारपेठांमध्ये झेंडूला प्रती किलो फक्त ८ ते १२ रुपये दर मिळतो आहे. दुसरीकडे, फटाक्यांचे भाव मात्र गगनाला भिडले आहेत.

शासनाची उदासीनता – व्यापाऱ्यांचा फायदा

फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कुठलेही आधारभाव, साठवणूक किंवा हमी न मिळाल्यामुळे त्यांचा माल अक्षरशः वाया जात आहे. फुले सडत आहेत, आणि खर्च भरूनही निघत नाही. दुसरीकडे, फटाका विक्रेत्यांकडे ग्राहकांची गर्दी, सरकारचे कोणतेही नियमन नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी फटाक्यांचे दर मनमानी वाढवले असून त्यातून मोठा नफा कमावला जातो आहे.
शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात
शेतकरी महागडी बी-बियाणं, खतं, मजुरी, वाहतूक या सगळ्या खर्चांमध्ये अडकून पडलेत. त्यांना ना उत्पादनाचा योग्य मोबदला मिळतोय, ना शासकीय मदत. त्यामुळे त्यांच्या घरात यंदाची दिवाळी मात्र अंधारातच जात आहे.

व्यापाऱ्यांच्या घरासमोर लक्ष्मीचा वास, फटाक्यांचा खर्च

दुसरीकडे, शहरांतील फटाका दुकानदारांच्या घरासमोर मात्र फटाक्यांचा लखलखाट आहे. लाखो रुपयांचे फटाके उडवले जातात. ग्राहकांच्या खरेदीने व्यापारी मालामाल होत आहेत, आणि याकडे शासन डोळेझाक करत आहे.

शेतकऱ्यांना हक्काचा भाव आणि संरक्षण हवे

या विषमतेचा अंत व्हावा यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, फुलशेतीला आधारभाव, साठवणूक सुविधा, आणि शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. केवळ कृषीमंत्रालय नव्हे, तर संपूर्ण प्रशासनाला याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने