महाराष्ट्र शासनाचा 2024 चा ‘आदरणीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार पत्रकार राकेश भट्ट यांना जाहीर

महाराष्ट्र शासनाचा 2024 चा ‘आदरणीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार पत्रकार राकेश भट्ट यांना जाहीर

महाराष्ट्र 24,न्यूज नेटवर्क 
18 फेब्रुवारी 2026
हिंगोली,  आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र शासनाकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘आदरणीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कारासाठी 2024 वर्षी दैनिक भास्करचे जिल्हा वार्ताहर राकेश भट्ट यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. आरोग्य विषयक पत्रकारितेद्वारे जनजागृती, लोकसहभाग आणि शासकीय आरोग्य योजनांचा प्रभावी प्रसार केल्याबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
मुंबई येथील स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात रविवार, २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता आयोजित विशेष कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. कार्यक्रमास आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर तसेच सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचा उद्देश आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करणे हा आहे. संस्था, डॉक्टर, पत्रकार तसेच आरोग्य विभागातील प्रादेशिक कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी हा पुरस्कार प्रदान केला जातो. आरोग्य अभियान यशस्वी करणे, ती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे, लोकसहभागातून विविध आरोग्य कार्यक्रम राबवणे आणि जनजागृती घडवणे या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कारामध्ये एक लाख रुपये रोख, मानचिन्ह व प्रमाणपत्राचा समावेश आहे.
राज्य आरोग्य सेवा, पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. कैलाश बाबिस्कर यांनी १८ फेब्रुवारी रोजी अधिकृत घोषणा केली. हिंगोली शहरातील रहिवासी असलेले पत्रकार राकेश भट्ट यांनी विकास पत्रकारितेच्या माध्यमातून आरोग्य विषयांवर सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे. खारगोली येथे वैद्यकीय महाविद्यालय, एमआरआय मशीन तसेच आयुष रुग्णालयाच्या उभारणीसाठी त्यांनी आंदोलन व जनजागृती मोहिमा राबवून विषय प्रशासनाच्या पातळीवर पोहोचवला. शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा प्रसार करून नागरिकांना आरोग्य उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
राकेश भट्ट यांना यापूर्वीही पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१४ सालचा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयातर्फे २०११, २०१२ व २०१३ या सलग तीन वर्षांत संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय गृह मंत्रालयातर्फे महात्मा गांधी तंटामुक्ती ग्राम पुरस्कार (२०११), ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार (२०१४) तसेच पत्रकार संघटनेचा दर्पण पुरस्कारही त्यांनी प्राप्त केला आहे.
पत्रकार राकेश भट्ट यांना राज्यस्तरावरील ‘आदरणीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पत्रकार क्रिकेट व पत्रकार वेल्फेअर सोसायटीच्या वतीने कल्याण देशमुख, सुधाकर वाढवे, सुनील पाठक, विजय गुंडेकर, विजय पाटील, प्रसाद आर्वीकर, शिवाजी मेटकर, सुमित कानेड, सुधीर गोगटे, गोपाल सरनाईक, दिलीप हळदे, प्रीतम राठोड, सुनील नागरे, गणेश घ्यार आदींनी अभिनंदन केले आहे.
आरोग्य विषयक विकास पत्रकारितेद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या राकेश भट्ट यांच्या या यशामुळे हिंगोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने