हिंगोलीत मुख्याध्यापकाला २८ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

हिंगोलीत मुख्याध्यापकाला २८ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
05मार्च 2026
हिंगोली : वार्षिक घरभाडे भत्ता सुरू ठेवण्यासाठी २८ हजार रुपयांची लाच मागून स्वीकारणाऱ्या एका मुख्याध्यापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (लाप्रवि) पथकाने गुरुवारी (दि. ५ मार्च) सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई हिंगोली-नांदेड रोडवरील खटकाळी बायपास येथील आयान पान सेंटरसमोर करण्यात आली.
या प्रकरणातील आरोपी संतोष बबनराव कढणे (वय ४४) हे मधुमती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लाख, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली येथील मुख्याध्यापक (गट-ब) असून ते सध्या वृंदावन पार्क, लेडी हार्डिंग रोड, गजानन महाराज मंदिराजवळ, वाशिम येथे वास्तव्यास आहेत.
लाप्रवि हिंगोली येथे २४ फेब्रुवारी २०२६ रोजी ३५ वर्षीय तक्रारदाराने लेखी तक्रार दिली होती. तक्रारदारास पगारामध्ये वार्षिक ५८,१२० रुपये घरभाडे भत्ता मिळतो. मात्र आरोपी मुख्याध्यापक संतोष कढणे यांनी या रकमेच्या ५० टक्के म्हणजे २९,०६० रुपये लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. तसेच ही रक्कम न दिल्यास तक्रारदार मुख्यालयात राहत नाहीत असा अहवाल शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवून त्यांचा घरभाडे भत्ता बंद करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
या तक्रारीची लाच मागणी पडताळणी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आली. पडताळणीदरम्यान आरोपीने तक्रारदाराकडे ५८,१२० रुपयांच्या घरभाडे भत्त्यापैकी ५० टक्के रकमेवर तडजोड करून २८,००० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच ही रक्कम स्वतः स्वीकारण्यासही तो तयार असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानुसार गुरुवारी (दि. ५ मार्च) हिंगोली-नांदेड रोडवरील खटकाळी बायपास येथील आयान पान सेंटरसमोर लाप्रवि पथकाने सापळा रचला. या वेळी आरोपी संतोष कढणे यांनी तक्रारदाराकडून पंचासमक्ष २८,००० रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून विवो कंपनीचा मोबाईल, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, एसबीआय, बीओआय व ॲक्सिस बँकेचे एटीएम कार्ड, ब्रिजा कारची चावी तसेच १०० रुपये रोख रक्कम आढळून आली. मोबाईल हँडसेटची तपासणी करून आवश्यक असल्यास तो जप्त करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
दरम्यान, आरोपीच्या राहत्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया लाप्रवि वाशिम मार्फत सुरू आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात येणार असल्याचे लाप्रवि विभागाकडून सांगण्यात आले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, हिंगोलीचे  सहायक पोलीस निरीक्षक राजेश मलपिलु यांच्या यांच्या पथकामध्ये 
विजय शुक्ला इनुस शेख  जमादार, भगवाण मंडलीक, राजाराम फुपाटे रवि वरणे, विनोद पूंडगे,  शिवाजी वाघ.  अकबर शेख यांनी सहभाग घेतला होता 
.  कारवाईचे पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक विकास घनवट यांनी केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुलभा राऊत करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने