वंचितच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदासाठी चुरस वाढली; अनेक इच्छुकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
13 मार्च 2026
हिंगोली : वंचित बहुजन आघाडीच्या हिंगोली जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुकांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली असून जिल्हाध्यक्षपदासाठी अनेक कार्यकर्त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात या निवडीची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
पक्षाकडून जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती नुकत्याच घेण्यात आल्या. काही पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती पार पडल्या असल्या तरी मागील दोन दिवसांपासून पुढील प्रक्रिया झालेली नसल्यामुळे मुलाखत दिलेल्या सर्व इच्छुकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. प्रत्येक इच्छुक कार्यकर्ता “मीच जिल्हाध्यक्षपदाचा दावेदार” असल्याचे सांगत सक्रिय झाला आहे.
हिंगोली जिल्हाध्यक्ष पदासाठी शिवाजीराव खरात, अशोक कांबळे, सज्जन निरगुडे, सुनील खिल्लारे, राजू इंगोले आणि शिवचरण आप्पा बेलाळ या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. या सर्वांनी पक्षाकडे अर्ज भरून मुलाखतीही दिल्या आहेत.
पक्षाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेतला जाणार आहे. त्यांच्या पक्षातील कामगिरी, कार्यकर्त्यांमधील संपर्क तसेच संघटन वाढीसाठी केलेले प्रयत्न यांची चाचणी घेतल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले सर्व कार्यकर्ते सध्या आपापल्या स्तरावर संपर्क वाढवत असून पक्षश्रेष्ठींकडून कोणाच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ पडणार याकडे हिंगोली जिल्ह्यातील वंचित कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे
टिप्पणी पोस्ट करा