यशस्वी सापळा कारवाई : लाच स्वीकारताना वरिष्ठ लिपिक रंगेहात पकडला
हिंगोली, दि. 24 मार्च 2026 – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ला.प्र.वि.) हिंगोली यांनी आज यशस्वी सापळा रचून पूर्णा पाटबंधारे विभागातील वरिष्ठ लिपिकास 1,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे शासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, 41 वर्षीय तक्रारदार हे सिंचन व्यवस्थापन उपविभाग क्रमांक 3, हिंगोली येथे लिपिक पदावर कार्यरत आहेत. त्यांचे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर 2025 या तीन महिन्यांचे थकीत वेतन बिल तयार करून ते कोषागारात सादर करण्यासाठी वरिष्ठ लिपिक सलीम अब्दुल अहमद शेख (वय 45) यांनी 1,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार दि. 23 मार्च रोजी ला.प्र.वि. हिंगोली येथे दाखल करण्यात आली होती.
तक्रारीची पडताळणी पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत करण्यात आली असता आरोपी सलीम शेख यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ला.प्र.वि. पथकाने सापळा रचला.
आज पूर्णा पाटबंधारे विभाग, वसमत येथील त्यांच्या कॅबिनमध्ये तक्रारदाराकडून 1,000 रुपयांची लाच स्वीकारताना आरोपीला शासकीय पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले.
कारवाईदरम्यान आरोपीकडून एक विवो कंपनीचा मोबाईल, जलसंपदा विभागाचे ओळखपत्र, एसबीआय बँकेची दोन एटीएम कार्डे व 2,740 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. मोबाईलची तपासणी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तसेच आरोपीच्या निवासस्थानी घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 च्या कलम 7 अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हा नोंद झाल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात येणार आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीमती सुलभा राऊत यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
कारवाईत
विजय शुक्ला इनुस शेख जमादार, भगवाण मंडलीक, राजाराम फुपाटे रवि वरणे, विनोद पूंडगे, शिवाजी वाघ. अकबर शेख यांनी सहभाग घेतला होता
पोलीस उपअधीक्षक विकास घनवट यांचे मार्गदर्शन लाभले. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश मलपिलु करीत आहेत.
सरकारी कामकाजात पारदर्शकता राखण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहतील, असा इशारा ला.प्र.वि. विभागाने दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा