कळमनुरीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; एकाविरुद्ध गुन्हा, मुद्देमाल जप्त

कळमनुरीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; एकाविरुद्ध गुन्हा, मुद्देमाल जप्त

कळमनुरी : शहरातील जुने बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई दि. 02 एप्रिल 2026 रोजी दुपारी करण्यात आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी कळमनुरी  येथील पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 134/2026 अन्वये महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादी लक्ष्मण देविदासराव भगत (वय 41), पोलीस कर्मचारी, यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी शेख अरबाज शेख अन्वर (वय 23, रा. काजी मोहल्ला, कळमनुरी) हा नागरिकांकडून पैसे घेऊन ‘तितली-भवरा’ या प्रकारचा जुगार खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी छापा टाकला असता आरोपीकडून एकूण 1300 रुपयांची रोकड व जुगार साहित्य जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालामध्ये 50 रुपयांच्या 16 नोटा (800 रुपये), 20 रुपयांच्या 18 नोटा (360 रुपये), 10 रुपयांच्या 14 नोटा (140 रुपये) तसेच कबूतर, भोवरा, पतंग, छत्री आदी चिन्हांचे चित्र असलेले बॅनर व चिठ्ठ्या यांचा समावेश आहे.
ही कारवाई जुने बसस्थानकाजवळील गुंजकर यांच्या कापड दुकानाशेजारील मोकळ्या जागेत दुपारी सुमारे 1.25 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. त्यानंतर दुपारी 3.43 वाजता गुन्ह्याची अधिकृत नोंद करण्यात आली.
पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांच्या आदेशाने तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी कुंदन कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. पोलीस उपनिरीक्षक नानाराव पोले पोलीस कर्मचारी भगत यांच्यासह पथकाने ही धाड यशस्वीरीत्या पूर्ण केली.
दरम्यान, शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार व्यवसायावर पोलिसांनी कडक भूमिका घेतली असून नागरिकांनी अशा प्रकारांपासून दूर राहावे, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने