हिंगोली बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे २५ दिवसांपासून बंद; प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह


हिंगोली बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे २५ दिवसांपासून बंद; प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
06एप्रिल 2026
हिंगोली, प्रतिनिधी:
हिंगोली येथील बस स्थानकात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे मागील सुमारे २५ दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून स्थानकात होणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा बसणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बस स्थानक परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या पुढाकारातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र, संबंधित कॅमेऱ्यांचे रिचार्ज न केल्यामुळे ते पूर्णपणे बंद पडले असून प्रशासनाच्या दुर्लक्षाचे हे उदाहरण मानले जात आहे.
सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याने स्थानकात प्रवाशांचे सामान चोरीला जाण्याच्या घटना वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि गर्दीच्या वेळेत प्रवाशांना अधिक धोका निर्माण झाला आहे.
या संदर्भात आगार व्यवस्थापक किशोर महाजन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांचा मोबाईल ‘नॉट रीचेबल’ असल्याचे समोर आले. त्यामुळे प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा स्थानकात गुन्हेगारी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने