पृथ्वी प्रणालीची आंतरक्रिया, मानवी कृती आणि पाण्याचा वापर या प्रकल्पासाठी धनुष कबाडे याला कांस्यपदक

पृथ्वी प्रणालीची आंतरक्रिया, मानवी कृती आणि पाण्याचा वापर या प्रकल्पासाठी धनुष कबाडे याला कांस्यपदक

7एप्रिल 2026
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क 
नांदेड, प्रतिनिधी वसमत येथील रहिवासी व पोलीस अंमलदार महारुद्र कबाडे यांचा सुपुत्र धनुष महारुद्र कबाडे (इयत्ता सहावी), ज्ञान भारती विद्या मंदिर, नांदेड येथील विद्यार्थी, याने डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा या प्रतिष्ठित स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत मुंबई येथे झालेल्या अंतिम तोंडी परीक्षेत कांस्यपदक पटकावले आहे.
विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, निरीक्षण क्षमता आणि तार्किक विचारांची कसोटी पाहणारी ही स्पर्धा राज्यातील अत्यंत मानाची मानली जाते. धनुषने या स्पर्धेच्या तिन्ही फेऱ्या यशस्वीरीत्या पार करत आपल्या बुद्धिमत्ता, जिज्ञासा आणि परिश्रमाच्या जोरावर अंतिम टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी नोंदवली.
तिसऱ्या फेरीसाठी सादर करण्यात आलेल्या प्रकल्पासाठी धनुषने “पृथ्वी प्रणालीची आंतरक्रिया, मानवी कृती आणि पाण्याचा वापर” हा विषय निवडला होता. या प्रकल्पाच्या तयारीसाठी त्याने विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन माहिती संकलित केली, तज्ञांशी संवाद साधला तसेच पाण्याच्या वापराबाबत सखोल अभ्यास करून विश्लेषण मांडले. त्याच्या प्रकल्पात पाणी संवर्धन, मानवी हस्तक्षेपाचा पर्यावरणावर होणारा परिणाम आणि संसाधनांचा शाश्वत वापर या बाबींवर विशेष भर देण्यात आला होता.
धनुषच्या या यशाबद्दल नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी त्याचे कौतुक केले असून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशामागे ज्ञान भारती विद्या मंदिरचे अध्यक्ष श्री. वाकोडे पाटील, श्री. आदित्य तुंगेनवर, श्रीमती जोशी, वर्गशिक्षक श्री. नगरे, श्री. सातारे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच आई-वडील सौ. स्नेहलता व महारुद्र कबाडे, काका श्री. सुनील कबाडे आणि श्री. बालाजी गोदरे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
धनुषच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे नांदेड जिल्ह्याचे नाव राज्यभरात उज्ज्वल झाले असून सर्व स्तरांतून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने