हिंगोलीत डीजे-मुक्त भीम जयंती साजरी करण्याचे आवाहन; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा.. डीवायएसपी कुंदन कुमार वाघमारे
हिंगोली : आगामी भीम जयंती उत्सव शांततामय आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा व्हावा यासाठी हिंगोली शहर पोलीस स्टेशनच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने वतीने आज शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस शहरातील विविध भीम जयंती मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी (डी वाय एस पी) कुंदन कुमार वाघमारे यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, न्यायालयाच्या आदेशानुसार यावर्षी भीम जयंती डीजे-मुक्त पद्धतीने साजरी करणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
तसेच, जयंतीदरम्यान मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्या किंवा सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींवरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. उत्सव शांततेत आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
बैठकीस पोलीस निरीक्षक संदीप मोदे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर मांजरमकर, प्राचार्य यू.एच. बलखंडे, पत्रकार सुधाकर वाढवे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाच्या या सूचनांचे पालन करून भीम जयंती उत्सव अनुशासनबद्ध आणि आदर्श पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन बैठकीतून करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा