धनगरवाडीतील तरुण शेतकऱ्याचा मृत्यू : आर्थिक वादातून तणाव, एकाविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
17 एप्रिल 2026
गोरेगाव (ता. सेनगाव)
तालुक्यातील धनगरवाडी येथे तरुण शेतकरी गोरख बबन पातळे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना १५ एप्रिल रोजी उघडकीस आली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित प्रकरणात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, रोजगार हमी योजनेअंतर्गत (रोहयो) विहीर कामांशी संबंधित आर्थिक व्यवहारांवरून काही वाद निर्माण झाले होते. या संदर्भात मयताच्या कुटुंबीयांचे कागदपत्र वापरून आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात संतोष किसन कोरडे यांचे नाव समोर आले आहे.
घटनेनंतर मयताच्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत, संबंधितांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय पुढील वैद्यकीय प्रक्रिया करू नये, अशी मागणी केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
यानंतर मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. दुसऱ्या दिवशी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत कारवाईची मागणी केली. अखेरीस नातेवाईकांच्या तक्रारीवरून संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबतही चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नियुक्त करण्यात आली आहे. तपास अधिकाऱ्यांकडून पुढील तपास सुरू असून अहवालानंतर अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मयताच्या कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा