हिंगोलीत संशयित हालचालीदरम्यान धारदार खंजरासह युवक ताब्यात पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे

हिंगोलीत संशयित हालचालीदरम्यान धारदार खंजरासह युवक ताब्यात
पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे 
महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क
हिंगोली, दि. 13 (प्रतिनिधी)  शहराजवळील हिंगोली-वाशिम रोडवरील कलगाव शिव परिसरात अन्नपूर्णा शाळेजवळील पुलाखाली संशयास्पद हालचाली करताना एका युवकाला पोलिसांनी धारदार शस्त्रासह ताब्यात घेतल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 11 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास आरोपी श्लोक राहुल खंदारे (वय 19, रा. सम्राट अशोक नगर, हिंगोली) हा संशयास्पद रित्या अंधाराचा फायदा घेत पुलाखाली लपून बसलेला आढळून आला. यावेळी त्याच्या ताब्यात एक धारदार लोखंडी खंजर (बाड) आढळून आला.
सदर खंजराची एकूण लांबी 15 इंच असून त्यातील पात्याची लांबी 10 इंच आणि मुठ 5 इंच आहे. पात्याची रुंदी मुठीजवळ 4.5 सेंमी असून टोकाकडे निमुळती होत जाते. या शस्त्राची किंमत सुमारे 300 रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा सूर्यास्त ते सूर्योदयाच्या दरम्यान स्वतःचे अस्तित्व लपवून गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी थांबलेला असल्याचा संशय आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 तसेच भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस नाईक बापुराव विठ्ठलराव चव्हाण  यांनी फिर्याद दिली असून गुन्हा दि. 11 एप्रिल रोजी रात्री 11.35 वाजता दाखल करण्यात आला. आरोपीस नोटीस देऊन सोडण्यात आले असून सध्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
या कारवाईदरम्यान पोलीस निरीक्षक डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी चव्हाण व इतर पथकाने सहभाग घेतला. शहरात वाढत्या संशयास्पद हालचालींच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने