हिंगोलीत सिमेंट रस्त्यांसोबत वृक्षारोपणाची गरज अधोरेखित डॉ. बालाजी भाकरे

हिंगोलीत सिमेंट रस्त्यांसोबत वृक्षारोपणाची गरज अधोरेखित
डॉ. बालाजी भाकरे यांचे आवाहन
हिंगोली : शहरातील एनटीसी परिसरात सध्या सिमेंट रस्त्यांचे काम वेगाने सुरू असून, या पार्श्वभूमीवर पर्यावरण संतुलन राखण्यासाठी रस्त्यांसोबत वृक्षारोपणाची अत्यंत गरज असल्याचे मत डॉ. बालाजी भाकरे यांनी व्यक्त केले आहे.
सिमेंट रस्त्यांमुळे परिसरातील तापमानात वाढ होण्याची शक्यता असते. या उष्णतेचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर तसेच पर्यावरणावर होऊ शकतो. यासाठी घरासमोर योग्य नियोजन करून वृक्षारोपण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. भाकरे यांनी सुचविले की, रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वी नागरिकांनी घरासमोर प्लास्टिकच्या टोपल्यांच्या साहाय्याने खड्डे तयार करून त्यामध्ये रोपे लावावीत. या पद्धतीमुळे झाडांच्या मुळांना आवश्यक जागा मिळेल आणि भविष्यात रस्त्याच्या मजबुतीवरही परिणाम होणार नाही.
“वृक्षारोपण केल्यास केवळ तापमान नियंत्रणात राहणार नाही, तर हवा शुद्ध राहण्यास मदत होईल. शहरातील नागरिकांनी ही जबाबदारी स्वतःहून स्वीकारून पुढाकार घ्यावा,” असे आवाहनही त्यांनी केले.
स्थानिक प्रशासनानेही सिमेंट रस्त्यांच्या कामांसोबत वृक्षारोपणासाठी नियोजन करणे गरजेचे असून, नागरिक आणि प्रशासन यांचा समन्वय झाल्यास हिंगोली शहर अधिक हरित आणि पर्यावरणपूरक बनू शकते, असे मत व्यक्त होत आहे.
दरम्यान, एनटीसी परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिल्यास शहरासाठी हा एक आदर्श ठरू शकतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने