डायल 112 कॉलवर विलंब; कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अंमलदारास निलंबित
पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांचा दणका
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
14 मे 2026
हिंगोली | प्रतिनिधी
हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर पुन्हा एकदा कठोर कारवाई करत डायल 112 सेवेत कार्यरत असलेल्या एका पोलीस अंमलदारास तात्काळ निलंबित केले आहे. नागरिकांना त्वरित आणि प्रभावी पोलीस मदत मिळावी यासाठी त्यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांवर काटेकोर नियंत्रण ठेवले असून, कर्तव्यात कसूर सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून दिला आहे.
महाराष्ट्र पोलीस दलाकडून नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत मिळावी यासाठी डायल 112 ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेद्वारे पीडित व्यक्तीकडून मदतीचा कॉल प्राप्त होताच संबंधित पोलीस यंत्रणेला तत्काळ घटनास्थळी पोहोचणे अपेक्षित असते. विशेषतः कमी वेळेत प्रतिसाद देण्यावर पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांचे बारकाईने लक्ष असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, दिनांक 12 मे 2026 रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन कळमनुरी हद्दीत डायल 112 वर मदतीसाठी कॉल प्राप्त झाला होता. या कॉलवर त्वरित प्रतिसाद देऊन पीडित व्यक्तीच्या मदतीसाठी घटनास्थळी पोहोचणे अपेक्षित असताना, डायल 112 कर्तव्यावरील पोलीस अंमलदार 639/ किशोर शंकर राठोड, नेमणूक पोलीस स्टेशन कळमनुरी यांनी तब्बल दीड तास उशिराने प्रतिसाद दिल्याची गंभीर बाब समोर आली.
ही बाब पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ दखल घेत संबंधित पोलीस अंमलदार किशोर शंकर राठोड यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.
या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून, नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात कोणतीही निष्काळजीपणा सहन केला जाणार नसल्याचा कडक संदेश पोलीस प्रशासनाने दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा