हिंगोलीत डॉक्टर बालाजी भाकरे यांचा सहपत्नी सत्कार; दोन लाख रुग्णसेवेचा गौरव
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
01मे 2026
हिंगोली : ग्रामीण भागातील आरोग्यसेवेला नवे परिमाण देणारे डॉक्टर बालाजी भाकरे यांचा हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात सहपत्नी विशेष सत्कार करण्यात आला. 2020 पासून ‘ई-संजीवनी’ या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत सुमारे दोन लाख रुग्णांना सेवा दिल्याबद्दल शासनाच्या वतीने त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांनी डॉक्टर भाकरे आणि त्यांच्या सहपत्नीचा वृक्ष देऊन सन्मान केला. यावेळी पत्रकार सुधाकर वाढवे, पोलीस उपनिरीक्षक राहुल घुले, पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी वगे, श्रीरंग पंडित, गणेश ठोके, गजानन पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
सत्कार स्वीकारताना डॉक्टर भाकरे यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे झळकत होता. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या यशाचे श्रेय पत्नीला देत, “माझी पत्नी नेहमी माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली, त्यामुळेच मी ‘ई-संजीवनी’च्या माध्यमातून दोन लाख रुग्णांपर्यंत पोहोचू शकलो,” असे सांगितले.
ग्रामीण भागातील रुग्णांना सहज आणि प्रभावी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या कार्याची सर्व स्तरातून प्रशंसा होत असून, हा सत्कार त्यांच्या सेवाभावी कार्याला मिळालेली मोठी पावती मानली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा