हिंगोली तालुक्यातील राहुली खुर्द येथे शेतकऱ्याच्या टिन शेडला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
3 मे 2026
हिंगोली तालुक्यातील राहुली खुर्द येथे रविवारी सायंकाळी सुमारे नऊच्या सुमारास शेतकऱ्याच्या टिन शेडला भीषण आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. या आगीत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शेतीसाठी वापरले जाणारे साहित्य पूर्णतः जळून खाक झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गट क्रमांक 168 मधील शेतकरी नितेश रमेश लाल जयस्वाल यांच्या मालकीच्या तीन टिन शेडला अचानक आग लागली. आगीने काही वेळातच उग्र रूप धारण केल्याने शेडमध्ये ठेवलेली शेतीसाठी लागणारी पाईपलाईन, विविध शेती अवजारे तसेच इतर साहित्य पूर्णतः जळून नष्ट झाले. या घटनेत अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या पथकानेही घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून घटनेची नोंद पोलिसांकडे करण्यात आली आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा