हिंगोली सायबर सेलची तत्पर कारवाई; जेष्ठ वकिलांची चुकून पाठवलेली रक्कम अवघ्या ५ मिनिटांत परत
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली, दि. ५ मे – डिजिटल व्यवहार करताना झालेल्या छोट्याशा चुकीमुळे मोठा आर्थिक तोटा होऊ शकतो, मात्र हिंगोली पोलिसांच्या तत्परतेमुळे एका जेष्ठ नागरिकांची १० हजार रुपयांची रक्कम अवघ्या पाच मिनिटांत परत मिळाल्याची दिलासादायक घटना समोर आली आहे.
हिंगोली येथील गणेश वाडी परिसरात राहणारे जेष्ठ विधीतज्ञ श्री. रंभाजी हनुमंत शिंदे (वय ८०) यांनी यात्रेसंदर्भात एका व्यक्तीस फोनपे द्वारे १० हजार रुपये पाठविताना चुकून चुकीच्या मोबाईल क्रमांकावर रक्कम पाठवली. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून रक्कम परत मागितली; मात्र समोरून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शिंदे यांनी तात्काळ हिंगोली सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली. सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तातडीने कार्यवाही सुरू केली आणि अवघ्या पाच मिनिटांत संबंधित खात्यातून रक्कम परत मिळवून दिली.
या तत्पर कारवाईमुळे जेष्ठ नागरिकांनी हिंगोली पोलिसांचे मनापासून आभार मानले. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी जेष्ठ नागरिक, महिला आणि मुलांच्या तक्रारींवर सहानुभूतीपूर्वक व तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या असून, त्यानुसार पोलिसांकडून कार्यवाही केली जात असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.
हिंगोली पोलीस नागरिकांच्या सेवेसाठी २४ तास तत्पर असून, कोणत्याही आपत्कालीन किंवा पोलीस मदतीसाठी नागरिकांनी ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर विनामूल्य संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा