लॉकरमधून दागिने घरी आणलेत? सावधान! घरातील कपाट हेच चोरट्यांचे पहिले टार्गेट
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
07 मे 2019
हिंगोली | प्रतिनिधी :
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून अनेक नागरिक बँकेतील लॉकरमधून सोन्या-चांदीचे दागिने काढून घरी आणत आहेत. मात्र लग्न समारंभ संपल्यानंतरही हे दागिने घरातील कपाटात ठेवले जात असल्याने चोरीच्या घटना वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत हिंगोली पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांनी सांगितले की, घरफोडीच्या घटनांमध्ये चोरट्यांचे पहिले लक्ष्य हे घरातील कपाट असते. त्यामुळे लॉकरमधून आणलेले दागिने किंवा घरातील इतर मौल्यवान वस्तू कपाटात ठेवणे धोकादायक ठरू शकते. काम झाल्यानंतर दागिने तात्काळ पुन्हा बँक लॉकरमध्ये जमा करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अनेक कुटुंबे फिरण्यासाठी किंवा मूळ गावी जात असल्याने बंद घरांवर चोरट्यांची नजर असते. त्यामुळे बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना घर बंद असल्याची माहिती द्यावी. घराला बाहेरून कुलूप लावण्याऐवजी शक्य असल्यास आतल्या बाजूने कुलूप लावावे. तसेच घरातील काही दिवे सुरू ठेवावेत, जेणेकरून घर बंद असल्याचा संशय येणार नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
याशिवाय परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन गल्लीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, स्थानिक वॉचमनची व्यवस्था करावी आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलीसांच्या टोल फ्री क्रमांक 112 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
उन्हाळ्यात नागरिक घराबाहेर किंवा अंगणात झोपत असल्याने महिलांच्या अंगावरील दागिने चोरीला जाण्याच्या घटनाही वाढतात. तसेच घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरटे घरात प्रवेश करून कपाट फोडण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
हिंगोली पोलीस दलातर्फे मालमत्तेविरुद्ध होणारे गुन्हे रोखण्यासाठी दैनंदिन नाकाबंदी, पोलीस स्टेशन स्तरावरील पेट्रोलिंग तसेच स्थानिक गुन्हे शाखेची विशेष गस्त सुरू करण्यात आली आहे. तरीदेखील नागरिकांनी स्वतः सतर्क राहून मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
“चोरी टाळण्यासाठी नागरिकांची सतर्कता हीच सर्वात मोठी सुरक्षा आहे,” असे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा