हिंगोलीत ग्रामसेवकाला २,५०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

हिंगोलीत ग्रामसेवकाला २,५०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
13 मे 2026
हिंगोली, दि. १३ मे २०२६ :
हिंगोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी यशस्वी सापळा कारवाई करत ग्रामपंचायत सवना येथील ग्रामसेवकाला २,५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई सेनगाव तालुक्यातील गोरेगाव चौफुली परिसरात करण्यात आली.
या प्रकरणातील आरोपीचे नाव रामप्रसाद ज्ञानोबाराव खिल्लारी (वय ४८) असे असून तो ग्रामपंचायत सवना, ता. सेनगाव, जि. हिंगोली येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे. आरोपी हा मूळचा गोरेगाव, ता. सेनगाव येथील रहिवासी आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १२ मे २०२६ रोजी एका ६० वर्षीय तक्रारदाराने तक्रार दिली होती. तक्रारदार हे सवना, ता. सेनगाव येथील रहिवासी असून त्यांच्या नावावर घरकुल मंजूर झाले आहे. घरकुलाच्या संयुक्त पाहणी अहवालावर स्वाक्षरी करून तो पंचायत समिती, सेनगाव येथे पाठविण्यासाठी आरोपी ग्रामसेवक रामप्रसाद खिल्लारी यांनी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती.
तक्रारीची पडताळणी १३ मे रोजी करण्यात आली. पंच क्रमांक १ यांच्यासमक्ष आरोपीने तक्रारदाराकडे दोन ते तीन हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी तक्रारदाराने “पैसे जरा जास्त होतात” असे सांगितल्यावर आरोपीने “५०० रुपये कमी द्या” असे म्हणत २,५०० रुपयांवर तडजोड करत लाचेची मागणी कायम ठेवली. पडताळणी कारवाईदरम्यान ही मागणी निष्पन्न झाली.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. दि. १३ मे रोजी अतिथी बार अँड रेस्टॉरंटसमोर, सेनगाव रोडवरील गोरेगाव चौफुली येथे आरोपीने पंचासमक्ष तक्रारदाराकडून २,५०० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने कारवाई करत आरोपीला रंगेहात पकडले.
कारवाईदरम्यान आरोपीकडून वन प्लस कंपनीचा मोबाईल, आधार कार्ड, पॅन कार्ड, एक छोटी डायरी तसेच ५,६०० रुपयांची रोख रक्कम आढळून आली. मोबाईलची तपासणी करून आवश्यकतेनुसार जप्तीची प्रक्रिया ठेवण्यात आली आहे. आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
ही कारवाई श्रीमती सुलभा राऊत, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बिजय शुक्ला, युनुस शेख, रवि वरणे, मोविंदर गोविद शिंदे, गजानण पवार विनोद पुंडगे, शिवाजी वाघ, चालक अकबर शेख
हिंगोली यांनी केली. कारवाईचे पर्यवेक्षण श्री विकास घनवट, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, हिंगोली यांनी केले असून पुढील तपासही त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने