बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पोलीस पाटलांचा सन्मान; “गावामध्ये एकोपा नांदावा” – पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे

. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पोलीस पाटलांचा सन्मान; “गावामध्ये एकोपा नांदावा” –
 पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
04 मे 2026 
हिंगोली – हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव शांततेत व उत्कृष्टरीत्या पार पाडण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल गावागावातील पोलीस पाटलांचा गौरव करण्यात आला. या उपक्रमांतर्गत एकूण ४० पोलीस पाटलांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी “गावामध्ये एकोपा नांदावा, समाजात शांतता आणि सलोखा टिकून राहावा,” असे प्रतिपादन केले. गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी त्यांनी पोलीस पाटलांना मार्गदर्शन करताना गावातील नागरिकांसोबत सतत जनसंपर्क ठेवावा, ग्रामसभा, शाळा तसेच इतर शासकीय कार्यालयांना वेळोवेळी भेट द्यावी, अशा सूचना दिल्या. गावामध्ये वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, तसेच अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देऊन त्यांना चुकीच्या प्रवृत्तींपासून दूर ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
तसेच गावामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेची माहिती वेळोवेळी पोलीस ठाण्याला देणे, कोणावरही विनाकारण अन्याय होणार नाही याची काळजी घेणे, या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. आंबेडकर जयंती दरम्यान बंदोबस्त ठेवून पोलीस प्रशासनाला प्रभावी सहकार्य केल्याबद्दल हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील ४० गावांतील पोलीस पाटलांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास पीएसआय राहुल घुले, पीएसआय श्रीदेवी वगे, पत्रकार सुधाकर वाढवे यांच्यासह पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने