उसने दिलेले पैसे परत मागितले मित्राकडून मारहाण; घरात घुसून जीवे मारण्याची धमकी

उसने दिलेले पैसे परत मागितले मित्राकडून मारहाण; 
वकिलाकडून घरात घुसून जीवे मारण्याची धमकी

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
हिंगोली, दि. 17 मे 
(प्रतिनिधी) – उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून एका व्यक्तीस मारहाण करून त्याच्या घरात अनधिकृत प्रवेश करत अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशोक गंगाधर कांबळे (वय 43, रा. आनंद नगर, अकोला बायपास, बळसोंड, ता. जि. हिंगोली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विजय कळासरे (रा. शिक्षक कॉलनी, बळसोंड) व ॲड किशोर भुक्तार  यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 16 मे 2026 रोजी दुपारी 2 ते रात्री 8.30 वाजेच्या दरम्यान अकोला बायपास परिसर तसेच फिर्यादीच्या राहत्या घरी ही घटना घडली. आरोपी व फिर्यादी हे एकमेकांचे मित्र असून उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीची गच्ची धरून थपडा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादी घरी नसताना त्यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 328/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 333, 296, 115(2), 351(2), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास  पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.  खोडवे हे करीत आहेत  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने