हिंगोली जिल्ह्यासाठी १४ व १५ मे रोजी यलो अलर्ट जारी
उष्माघाताची शक्यता वाढली; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली, दि. १३ : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी मंगळवारी दिलेल्या सूचनेनुसार हिंगोली जिल्ह्यासाठी १४ व १५ मे या कालावधीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दोन दिवसांत जिल्ह्यातील काही भागांमध्ये उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यात सध्या तापमानात मोठी वाढ होत असून तीव्र उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गर्भवती महिला, आजारी व्यक्ती तसेच स्थूल व्यक्तींनी उष्णतेपासून बचावासाठी विशेष काळजी घेण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
उष्मालाट काळात घ्यावयाची काळजी
प्रशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, नागरिकांनी तहान नसली तरी नियमित व पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी ओआरएस, लिंबूपाणी, ताक, नारळपाणी, भाताची पेज, लस्सी यांसारख्या द्रवपदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अपस्मार, हृदयरोग, मूत्रपिंड किंवा यकृतविकार असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच द्रवपदार्थांचे सेवन करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच नागरिकांनी हलक्या रंगाचे, सैलसर आणि सुती कपडे वापरावेत. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा. डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल आणि त्वचेच्या संरक्षणासाठी सनस्क्रीन वापरण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
या गोष्टी टाळा
उष्णतेच्या तीव्रतेमुळे नागरिकांनी विशेषतः दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर जाणे व श्रमाची कामे करणे टाळावे. अनवाणी बाहेर फिरू नये. अतिउष्णतेच्या काळात स्वयंपाकघर हवेशीर ठेवण्याची काळजी घ्यावी.
दारू, चहा, कॉफी आणि शीतपेये यांचे अतिसेवन टाळण्याचे आवाहन करण्यात आले असून यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. जास्त मीठ, तिखट, तेलकट आणि उच्च प्रथिनयुक्त अन्नपदार्थ टाळावेत. शिळे अन्न सेवन करू नये, असेही प्रशासनाने म्हटले आहे.
याशिवाय, उभ्या असलेल्या चारचाकी वाहनात लहान मुले किंवा पाळीव प्राणी ठेवू नयेत. घरामध्ये अनावश्यक उष्णता निर्माण करणारे चमकदार दिवे किंवा बल्बचा वापर कमी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
हिंगोली जिल्हा प्रशासनाने नागरिकांना हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उष्माघाताची लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा