हिंगोली शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी; काही भागातील वीजपुरवठा खंडित

हिंगोली शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी; काही भागातील वीजपुरवठा खंडित

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
हिंगोली, दि. ९ मे : हिंगोली शहरासह जिल्ह्यातील काही भागांत शनिवारी सकाळी अचानक जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. शुक्रवारीही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला होता.
शनिवारी सकाळी सुमारे आठ वाजून वीस मिनिटांच्या सुमारास हिंगोली शहरासह परिसरात अचानक सुसाट वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दरम्यान, मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात उकाड्यात मोठी वाढ झाली होती. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र, आज सकाळी झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून तापमानातही घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहरातील काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. अचानक वीज गेल्याने नागरिकांना काही काळ अडचणींचा सामना करावा लागला. महावितरणकडून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
हवामान विभागाने पुढील काही तासांत जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने