मोस्ट वाँटेड घोषित आरोपींना जामीन मंजूर; जिल्हा व सत्र न्यायालयाचा आदेश

मोस्ट वाँटेड घोषित आरोपींना जामीन मंजूर; जिल्हा व सत्र न्यायालयाचा आदेश

महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क 
6 जून 2026
हिंगोली | प्रतिनिधी
खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गाजलेल्या प्रकरणातील मोस्ट वाँटेड घोषित करण्यात आलेल्या दोन आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली यांनी जामीन मंजूर केला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील कायदेविषयक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

प्रकरणातील माहितीनुसार, दि. २ मार्च २०२२ रोजी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, दि. २२ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री सुमारे २ ते २.३० वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी आपल्या मित्रासोबत बेलवाडी शिवारात झोपण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपींनी तलवारीने कपाळावर, कोयत्याने डोक्यावर तसेच लोखंडी रॉडने कपाळ व छातीवर वार करून गंभीर जखमी केले. याचवेळी फिर्यादीच्या साथीदारांवरही तलवार, कोयता व लोखंडी रॉडच्या साहाय्याने हल्ला करून त्यांना गंभीर दुखापत करण्यात आली.

या घटनेनंतर हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७, ३२६, ३२४, ४४७, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या कलम ३(१)(r), ३(१)(s) व ३(२)(va) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर प्रकरणातील आरोपी सागर रुस्तुम काळे व विक्की रुस्तुम काळे यांना पोलीस यंत्रणेने मोस्ट वाँटेड घोषित केले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर आरोपींनी ॲड. अजय उर्फ बंटी पंडीतराव देशमुख यांच्या मार्फत जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली येथे जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

या अर्जावर दि. ४ जून २०२६ रोजी सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मा. सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एन. माने यांनी आरोपी सागर रुस्तुम काळे व विक्की रुस्तुम काळे यांना जामीन मंजूर करण्याचा आदेश दिला.

आरोपींच्या वतीने ॲड. सतीश देशमुख, ॲड. शामकांत देशमुख व ॲड. प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी प्रभावी युक्तीवाद मांडला. या प्रकरणात त्यांना ॲड. शरद देशमुख, ॲड. अदित उर्फ शुभम देशमुख, ॲड. राहुल देशमुख, ॲड. योगेश खिल्लारी (पाटील), ॲड. रजत देशमुख, ॲड. अविनाश राठोड, ॲड. प्रकाश मगरे, ॲड. सुमित सातव, ॲड. आनंद खिल्लारे, ॲड. मुदस्सीर अ. रहिम, ॲड. आकाश चव्हाण, ॲड. श्रद्धा जैस्वाल, ॲड. लखन पठाडे, ॲड. गजानन घुगे, ॲड. सुमित कदम, ॲड. तुषार देशमुख, ॲड. तुषार पवार, ॲड. रुपाली खिल्लारे, शेख आदिल शेख अजीस, ॲड. सचिन सोनुने, ॲड. संदीप डवले, ॲड. शिवम देशमुख, ॲड. प्रिया कुरील, ॲड. हरपालसिंग सेठी व ॲड. महावीरसिंग चौहान यांनी सहकार्य केले.

गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या जामीन आदेशामुळे कायदेविषयक क्षेत्रात विविध प्रतिक्रिया उमटत असून, पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने