वाशिम रोडवर पोलिसांच्या जीपला ट्रकची जोरदार धडक; सुदैवाने जीवितहानी टळली

वाशिम रोडवर पोलिसांच्या जीपला ट्रकची जोरदार धडक; सुदैवाने जीवितहानी टळली

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क 
बासंबा, दि. ११ (प्रतिनिधी) : तालुक्यातील भिरडा शिवारात वाशिम-हिंगोली मार्गावर मंगळवारी पहाटे पोलिसांच्या गस्तीवरील जीपला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात जीपचे अंदाजे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बासंबा पोलिस ठाण्याचे ग्रेड पोलिस उपनिरीक्षक नामदेव काळे आणि चालक पोलिस अंमलदार माणिक वाळले हे मंगळवारी रात्री गस्त घालून वाशिम ते हिंगोली मार्गावरील भिरडा पाटी परिसरातून जात होते. पहाटे सुमारे ४.५५ वाजताच्या सुमारास समोरून येणाऱ्या यूपी ७५ सीटी ८७७९ क्रमांकाच्या ट्रकचालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवत पोलिसांच्या जीपला जोरदार धडक दिली.
धडकेमुळे पोलिसांच्या जीपचे मोठे नुकसान झाले. वाहनाच्या पुढील भागाचे नुकसान होऊन अंदाजे एक ते दीड लाख रुपयांची हानी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अपघाताची तीव्रता लक्षात घेता मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती; मात्र वाहनातील पोलिस कर्मचारी सुखरूप बचावल्याने अनर्थ टळला.
या प्रकरणी चालक पोलिस अंमलदार माणिक वाळले यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक सतेंद्रा कुमार दशरथसिंग (रा. महेलोड़ निलोड़, जि. हतावाह, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास पोलिस अंमलदार विष्णू पोले करीत आहेत.

भरधाव व निष्काळजी वाहनचालकांवर कारवाईची गरज
वाशिम-हिंगोली मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. भरधाव वेग आणि निष्काळजी वाहनचालनामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने