लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा कारवाईतील आरोपी तलाठीस जामीन मंजूर
अँड अजय उर्फ बंटी देशमुख
18जून2026
हिंगोली, प्रतिनिधी : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळा कारवाईत रंगेहात पकडण्यात आलेल्या एका तलाठीस जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली यांनी जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली असून, न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित आरोपीला दिलासा मिळाला आहे.
प्रकरणातील माहितीनुसार, दि. 05 जून 2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, हिंगोली यांच्याकडे एका तक्रारदाराने तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या व हक्कसोड वाटणीतून प्राप्त झालेल्या सुमारे 5 एकर वडिलोपार्जित शेतीचे फेरफार करून 7/12 उताऱ्यावर नाव नोंदविण्यासाठी संबंधित ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) रामेश्वर अर्जुन रोडगे यांनी 22 हजार रुपयांची लाच मागितली होती.
तक्रारीनुसार, आरोपी तलाठी यांनी यापूर्वी 8 हजार रुपये स्वीकारले होते, तर उर्वरित 14 हजार रुपये दिल्याशिवाय काम पूर्ण करणार नसल्याचे सांगितल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली. पडताळणीत तक्रारीतील बाबींना पुष्टी मिळाल्यानंतर सापळा कारवाईचे नियोजन करण्यात आले.
त्यानुसार दि. 05 जून 2026 रोजी हिंगोली-सेनगाव रोडवरील पुसेगाव फाटा परिसरात एसीबीच्या पथकाने सापळा रचला. यावेळी आरोपी तलाठी रामेश्वर अर्जुन रोडगे यांनी तक्रारदाराकडून पंचासमक्ष 14 हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले.
या घटनेनंतर आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन नर्सी नामदेव येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, 1988 च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, सदर गुन्ह्यातील आरोपी रामेश्वर अर्जुन रोडगे यांनी ॲड. अजय उर्फ बंटी पंडीतराव देशमुख यांच्या मार्फत जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली येथे नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर दि. 10 जून 2026 रोजी सुनावणी पार पडली.
सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून मा. सत्र न्यायाधीश श्री. डी. जी. ढोबळे यांनी आरोपीस जामीन मंजूर करण्याचा आदेश दिला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आरोपीला तात्पुरता दिलासा मिळाला असून, प्रकरणाचा पुढील न्यायालयीन प्रवास सुरू राहणार आहे.
आरोपीच्या वतीने ॲड. सतीश देशमुख, ॲड. शामकांत देशमुख व ॲड. प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना ॲड. शरद देशमुख, ॲड. अदित उर्फ शुभम देशमुख, ॲड. राहुल देशमुख, ॲड. योगेश खिल्लारी (पाटील), ॲड. रजत देशमुख, ॲड. अविनाश राठोड, ॲड. प्रकाश मगरे, ॲड. सुमित सातव, ॲड. श्रद्धा जैस्वाल, ॲड. आनंद खिल्लारे, ॲड. मुदस्सीर अ. रहिम, ॲड. आकाश चव्हाण, ॲड. लखन पठाडे, ॲड. गजानन घुगे, ॲड. सुमित कदम, ॲड. तुषार देशमुख, ॲड. रुपाली खिल्लारे, शेख आदिल शेख अजीस, ॲड. सचिन सोनुने, ॲड. संदीप डवले, ॲड. शिवम देशमुख, ॲड. प्रिया कुरील, ॲड. हरपालसिंग सेठी व ॲड. महावीरसिंग चौहान यांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा