हिंगोली ११२ शिक्षकांची उच्चश्रेणी मुख्याध्यापकपदी पदोन्नती अवघ्या दोन तासांत प्रक्रिया पूर्ण; सीईओ विवेक गायकवाड यांचा पुढाकार रिक्त पदांना दिला न्याय

हिंगोलीत ११२ शिक्षकांची उच्चश्रेणी मुख्याध्यापकपदी पदोन्नती
अवघ्या दोन तासांत प्रक्रिया पूर्ण; सीईओ विवेक गायकवाड यांचा  पुढाकार  रिक्त पदांना दिला न्याय

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
हिंगोली, दि. ३० : हिंगोली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात दीर्घकाळापासून रिक्त असलेल्या उच्चश्रेणी मुख्याध्यापकांच्या पदांवर अखेर ११२ शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या पुढाकाराने आणि नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे ही संपूर्ण पदोन्नती प्रक्रिया अवघ्या दोन तासांत पार पडली. पारदर्शक व वेगवान पद्धतीने झालेल्या या प्रक्रियेमुळे शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे ८८० प्राथमिक शाळा असून, त्यापैकी अनेक शाळांमध्ये उच्चश्रेणी मुख्याध्यापकांची पदे रिक्त होती. परिणामी अनेक ठिकाणी वरिष्ठ शिक्षकांकडे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून अतिरिक्त जबाबदारी होती. याचा शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असल्याची भावना व्यक्त केली जात होती.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया हाती घेतली. मंगळवारी (दि. ३०) नियोजित वेळेत सर्व पात्र शिक्षकांची समुपदेशन (कौन्सिलिंग) प्रक्रिया पार पाडून त्यांना पसंतीच्या उपलब्ध शाळांमध्ये नियुक्ती देण्यात आली. विशेष म्हणजे, बहुतांश शिक्षकांना त्यांच्या पसंतीचे ठिकाण मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
सीईओ विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाने संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, शिस्तबद्ध आणि वेळेत पूर्ण केली. पदोन्नतीस पात्र शिक्षकांची यादी, रिक्त पदांची माहिती आणि समुपदेशनाची प्रक्रिया नियोजनपूर्वक राबविण्यात आल्याने कोणताही गोंधळ निर्माण झाला नाही.
या पदोन्नतीमुळे रिक्त मुख्याध्यापक पदे भरली जाणार असून शाळांच्या प्रशासनाला सक्षम नेतृत्व मिळणार आहे. तसेच शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता, नियोजन, विद्यार्थी उपस्थिती, शैक्षणिक उपक्रम आणि शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होईल, असा विश्वास शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
शिक्षक संघटनांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेली पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाल्याने पात्र शिक्षकांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे. आता नव्याने पदोन्नती मिळालेल्या मुख्याध्यापकांकडून शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक प्रभावी कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने