कयाधू’चे पाणी पुन्हा पेटणार; उद्यापासून डॉ. शिंदे यांचे उपोषण

‘कयाधू’चे पाणी पुन्हा पेटणार; उद्यापासून डॉ. शिंदे यांचे उपोषण

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
हिंगोली, दि. 09 जून : जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कयाधू नदीच्या पाण्याच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नदीचे पाणी वळविण्याच्या प्रस्तावाविरोधात डॉ. रमेश शिंदे यांनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला असून, ९ जूनपासून खांबाळा येथे उपोषणास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि आंदोलक यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कयाधू नदीवरील प्रस्तावित भूमिगत वळण बोगद्याच्या कामाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, तसेच नदीवर १० उच्च पातळीच्या बंधाऱ्यांचे टेंडर तातडीने काढण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी हिंगोली आणि सेनगाव तालुक्यातील शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. यापूर्वीही याच मागण्यांसाठी डॉ. शिंदे यांनी उपोषण केले होते. त्यावेळी जलसंपदा विभागाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते. मात्र, संबंधित यंत्रणेकडून पुन्हा चालढकल सुरू असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे. या निवेदनात सुमारे २० किलोमीटर लांबीच्या आणि अंदाजे ९५० कोटी रुपयांच्या भूमिगत बोगद्याला तीव्र विरोध नोंदविण्यात आला आहे. हा बोगदा १०० ते १५० फूट खोल असल्यामुळे हिंगोली शहरासह सुमारे २५ गावांमधील भूजल पातळी घटण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. परिणामी विहिरी आणि बोअरवेल कोरड्या पडण्याचा धोका असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, नरसिंग खुटी, गडगीळवाडी, नरसी, ब्रह्मपुरी यांसह एकूण १० ठिकाणी बंधाऱ्यांच्या बांधकामासाठी सर्वेक्षण पूर्ण झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या बंधाऱ्यांचे टेंडर तात्काळ काढण्याची मागणी जोर धरत आहे.

८ जूनपर्यंत या मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास ९ जूनपासून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा डॉ. रमेश शिंदे आणि प्रल्हाद गवळी यांनी दिला आहे. या इशाऱ्यामुळे जिल्ह्यातील वातावरण तापण्याची शक्यता असून प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने