पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा; १०० वृक्ष लागवडीचा संकल्प
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
01 जुलै 2026
हिंगोली, प्रतिनिधी : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांनी आपला वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा केला. यानिमित्त ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात १०० वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला.
पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांनी पोलीस सेवेत रुजू झाल्यापासून ज्या-ज्या पोलीस ठाण्यात त्यांची नियुक्ती झाली, त्या प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपण करून परिसर हिरवागार करण्याचा उपक्रम सातत्याने राबविला आहे. पर्यावरण संवर्धनाची ही त्यांची सामाजिक बांधिलकी आजही कायम असून, त्याच परंपरेचा भाग म्हणून यावर्षीही वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी बोलताना त्यांनी प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. वृक्षारोपण ही केवळ औपचारिकता नसून भावी पिढ्यांसाठी स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण निर्माण करण्याची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मागील वर्षी बाळापूर पोलीस ठाण्यातही त्यांच्या पुढाकारातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले होते. त्या उपक्रमालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.
आज सकाळपासूनच पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत होता. वाढदिवसाचा कार्यक्रम साधेपणाने आणि सामाजिक संदेश देणाऱ्या उपक्रमातून साजरा करण्यात आला.
या प्रसंगी ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा