स्त्री शस्त्रक्रिया अपयश रोखण्यासाठी कडक उपाययोजना, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व खाजगी रुग्णालयांचे फायर- स्ट्रक्चरल ऑडिट करा : मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड

 स्त्री शस्त्रक्रिया अपयश रोखण्यासाठी कडक उपाययोजना, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व खाजगी रुग्णालयांचे फायर- स्ट्रक्चरल ऑडिट करा 
: मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
हिंगोली, दि. ९ जुलै : राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत करण्यात येणाऱ्या स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया (ट्युबेक्टॉमी) अपयशी ठरण्याच्या घटना भविष्यात टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक दक्षता घेत कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात. तसेच जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांसह कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी शासनमान्यता प्राप्त खाजगी रुग्णालयांचे तातडीने फायर ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिले.
जिल्हा गुणवत्ता आश्वासन समितीची बैठक बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात पार पडली. बैठकीत राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. विशेषतः जिल्ह्यात नोंद झालेल्या ७ स्त्री शस्त्रक्रिया अपयश (Failure) प्रकरणांवर सखोल चर्चा करण्यात आली. या प्रत्येक प्रकरणामागील वैद्यकीय, तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींचे परीक्षण करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला.
शस्त्रक्रियेपूर्वी नातेवाईकांना लेखी पूर्वकल्पना देण्याचे निर्देश
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी सांगितले की, काही महिलांमध्ये अंतर्गत आजार, पूर्वीच्या शस्त्रक्रियेमुळे निर्माण झालेली गुंतागुंत किंवा गर्भधारणा नलिका (फॅलोपियन ट्यूब) एकमेकांना चिकटलेल्या (Adhesions) असल्याने शस्त्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या अधिक जटिल ठरते. अशा परिस्थितीत शस्त्रक्रिया अपयशी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यामुळे अशा जोखमीच्या रुग्णांच्या बाबतीत शस्त्रक्रियेपूर्वीच त्यांच्या नातेवाईकांना संभाव्य धोक्यांची आणि गुंतागुंतीची लेखी स्वरूपात स्पष्ट माहिती देण्यात यावी, तसेच त्यांची संमतीही नियमानुसार घेण्यात यावी, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची खात्री झाल्यानंतरच प्रमाणपत्र द्या
कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर लाभार्थ्यांना दिले जाणारे शस्त्रक्रिया प्रमाणपत्र अत्यंत जबाबदारीने देण्याची आवश्यकता अधोरेखित करत मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी सांगितले की, शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी झाल्याची वैद्यकीय खात्री झाल्यानंतरच लाभार्थ्यांना शस्त्रक्रिया प्रमाणपत्र देण्यात यावे. यासंदर्भातील सर्व प्रस्तावांची काटेकोर तपासणी करूनच पुढील कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट निर्देश दिले.
आरोग्य संस्थांच्या सुरक्षेलाही प्राधान्य
बैठकीत आरोग्य संस्थांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही गंभीरतेने घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे फायर ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. यासोबतच शासनाकडून कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी मान्यता मिळालेल्या सर्व खाजगी रुग्णालयांचीही अग्निसुरक्षा व्यवस्था, इमारतीची संरचनात्मक सुरक्षितता आणि आवश्यक सुविधा यांची तपासणी करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले.
या ऑडिटमुळे आरोग्य संस्थांमधील संभाव्य धोके ओळखून आवश्यक सुधारणा करण्यास मदत होईल, तसेच रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत अधिक सक्षम यंत्रणा उभी राहील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा आणि जबाबदारीवर भर
जिल्हा गुणवत्ता आश्वासन समितीच्या बैठकीत राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवांचा दर्जा उंचावणे, शस्त्रक्रियांची गुणवत्ता वाढविणे, लाभार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आणि सर्व प्रक्रियेत पारदर्शकता व जबाबदारी सुनिश्चित करण्यावर विशेष भर देण्यात आला.
बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नामदेव पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता डुडुळे तसेच कार्यक्रम समन्वयक कमलेश ईशी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने