टीसी काढण्यासाठी गेलेल्या पालकास लोखंडी रॉडने मारहाण; संस्था चालकासह चौघांवर गुन्हा

टीसी काढण्यासाठी गेलेल्या पालकास लोखंडी रॉडने मारहाण; संस्था चालकासह चौघांवर गुन्हा

महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क 
14जुलै 2026
सेनगाव, प्रतिनिधी : तालुक्यातील कोळसा येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बी. फार्मसी महाविद्यालयात विद्यार्थिनीचा शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) काढण्यासाठी गेलेल्या पालकास लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी संस्था चालकासह चौघांविरुद्ध सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महाविद्यालयीन प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील पोटा खुर्द येथील गजानन बाबाराव जाधव यांच्या मुलीने कोळसा येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बी. फार्मसी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. मात्र, विद्यार्थिनीला संबंधित महाविद्यालयात पुढील शिक्षण घ्यायचे नसल्याने १० जुलै रोजी ती व तिचे वडील गजानन जाधव हे टी.सी. घेण्यासाठी महाविद्यालयात गेले होते.
यावेळी महाविद्यालय प्रशासनाने टी.सी. देण्यास नकार दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद पुढे हाणामारीपर्यंत पोहोचल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सुरुवातीला गजानन जाधव यांना शिवीगाळ करत थपडा व बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर वार करून जखमी करण्यात आले, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी १३ जुलै रोजी गजानन जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून संस्था चालक भास्कर बेंगाळ, मनोहर बेंगाळ, अभिषेक बेंगाळ तसेच अन्य एका व्यक्तीविरुद्ध सेनगाव पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस अधिकारी राजूदास जाधव करीत आहेत.
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान, टी.सी. काढण्यासाठी आलेल्या पालकाला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे या घटनेची व्यापक चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर संबंधित पालकाच्या तक्रारीवरून अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने