दांडेगाव ग्रामपंचायतीतील पांदण रस्त्यांच्या कामांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडे सखोल चौकशीची मागणी

दांडेगाव ग्रामपंचायतीतील पांदण रस्त्यांच्या कामांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडे सखोल चौकशीची मागणी

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
15 जुलै 2026
हिंगोली | प्रतिनिधी
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील मौजे दांडेगाव ग्रामपंचायतीत करण्यात आलेल्या पांदण रस्त्यांच्या कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार, नियमबाह्य कामे आणि शासन निधीच्या गैरवापराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी, हिंगोली यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, सुलोचनाबाई व्ही. चव्हाण ते ज्ञानेश्वर रा. साळुंके या पांदण रस्त्यासह इतर रस्त्यांच्या कामांमध्ये संबंधित अधिकारी आणि ग्रामपंचायत प्रशासनाने नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाच्या निधीतून अपूर्ण कामांवर खर्च दाखविणे, प्रत्यक्षात कामे न करता मस्टर काढणे, रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी आवश्यक साहित्याचा वापर न करणे तसेच रोड रोलरचा वापर न करताही त्याची बिले काढल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.
याशिवाय, एकाच पांदण रस्त्यासाठी दोन वेळा निधी उचलण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारदाराने जिल्हाधिकाऱ्यांकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
संबंधित सर्व कागदपत्रे, मस्टर, मोजमाप पुस्तिका (एम.बी.), बिले व खर्चाची तपासणी करण्यात यावी.
चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकारी व संबंधितांवर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
चौकशी अहवालाची प्रत तक्रारदाराला उपलब्ध करून द्यावी.
या तक्रारीमुळे दांडेगाव ग्रामपंचायतीतील विकासकामांच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, जिल्हा प्रशासन या प्रकरणाची कोणती भूमिका घेते आणि चौकशीत काय निष्पन्न होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने