स्तनपान करत असलेल्या महिलेचा विनयभंग; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
27 जुलै 2026
हिंगोली : बासंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घरामध्ये आपल्या लहान मुलीला स्तनपान करत असलेल्या २७ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील एका गावातील २७ वर्षीय महिला १५ जुलै रोजी दुपारच्या सुमारास आपल्या घरात लहान मुलीला स्तनपान करीत होती. त्यावेळी सुधाकर यशवंतराव काशिदे हा आरोपी तिच्या घरात शिरला. महिलेकडे वाईट नजरेने पाहत असताना महिलेने मुलीला बाजूला करून साडी व ब्लाऊज सावरत असतानाच आरोपीने तिचा विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने आरडाओरड केली असता आरोपीने तिला शिवीगाळ केली. तसेच, ही घटना कोणालाही सांगितल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेमुळे भयभीत झालेल्या महिलेने २४ जुलै रोजी बासंबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे सुधाकर यशवंतराव काशिदे याच्याविरुद्ध विनयभंग व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास आडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी भडके करीत आहेत. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा