आरोग्य सेवेत तंत्रज्ञानाची नवी क्रांती : १०२ रुग्णवाहिकांसाठी ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ सुविधेचे उद्घाटन३,१९५ रुग्णवाहिकांना एचपीसीएलचे पेट्रोकार्ड; १०२ सेवा आता सर्व रुग्णांसाठी उपलब्ध

आरोग्य सेवेत तंत्रज्ञानाची नवी क्रांती : १०२ रुग्णवाहिकांसाठी ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ सुविधेचे उद्घाटन
३,१९५ रुग्णवाहिकांना एचपीसीएलचे पेट्रोकार्ड; १०२ सेवा आता सर्व रुग्णांसाठी उपलब्ध
मुंबई, दि. ३० : राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक तंत्रस्नेही, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत १०२ रुग्णवाहिका सेवेसाठी ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ या नाविन्यपूर्ण सुविधेचा शुभारंभ सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते मुंबईतील आरोग्य सेवा आयुक्तालयात करण्यात आला. या उपक्रमामुळे राज्यातील ३,१९५ रुग्णवाहिकांच्या इंधन व्यवस्थापनात पारदर्शकता येण्याबरोबरच सेवेची कार्यक्षमता वाढणार असल्याचा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, अतिरिक्त आयुक्त जगन्नाथ विरकर, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहसंचालक सुनिता गोलाईत, प्रकल्प संचालक (ईएमएस) रवींद्र सावंत, उपसंचालक जयंत मुळे तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे संचालक विजय कंदेवाड, राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि एचपीसीएल कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, सार्वजनिक आरोग्य सेवा ही नागरिकांसाठी जीवनदायी व्यवस्था असून तिच्या बळकटीकरणासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक आहे. ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ उपक्रमामुळे रुग्णवाहिकांच्या इंधन खरेदी प्रक्रियेत आर्थिक पारदर्शकता येईल, अनावश्यक विलंब टळतील आणि संपूर्ण व्यवस्थापन अधिक उत्तरदायी बनेल.
राज्यातील शासकीय वाहनांना वेळेवर इंधन मिळण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आरोग्यमंत्री आबिटकर यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम साकारण्यात आला आहे. या माध्यमातून राज्यातील ३,१९५ रुग्णवाहिकांना एचपीसीएलचे ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ उपलब्ध करून देण्यात येणार असून इंधन भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि डिजिटल होणार आहे.
यावेळी आरोग्यमंत्र्यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण घोषणा करत सांगितले की, यापूर्वी माता व बालकांसाठी मर्यादित असलेली १०२ रुग्णवाहिका सेवा आता सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. ही सेवा अधिक सक्षम व प्रभावी करून भविष्यात १०८ रुग्णवाहिका सेवेला पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रभावी मॉनिटरिंगच्या माध्यमातून नागरिकांना अधिक जलद, विश्वासार्ह आणि दर्जेदार आपत्कालीन आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही आबिटकर यांनी स्पष्ट केले. एचपीसीएलच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेली ही सुविधा राज्यातील रुग्णवाहिका व्यवस्थापनात मोठा बदल घडवून आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोरोना महामारीच्या काळात सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने बजावलेल्या उल्लेखनीय भूमिकेचा उल्लेख करत राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही नागरिकांसाठी मोठा आधार असून तिच्यावरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने सेवाभाव, पारदर्शकता आणि जबाबदारीने काम करावे, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले.
‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आरोग्य आयुक्तालय, आयटी विभाग आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन करत, भविष्यातही तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने