राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमात हिंगोली जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी; १० आरोग्य संस्थांचा स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरवसीईओ विवेक गायकवाड

राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमात हिंगोली जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी; १० आरोग्य संस्थांचा स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव
सीईओ विवेक गायकवाड

  NQAS अंमलबजावणीला यश; सोमठाणा उपकेंद्राची ९३.०१ टक्के गुणांसह सर्वोत्तम कामगिरी

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
हिंगोली, दि. १४ : जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम (NQAS) अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील १० आरोग्य संस्थांचा स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट रोजी, पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. केंद्रीय व राज्यस्तरीय गुणवत्ता मानांकनाच्या प्रक्रियेत या संस्थांनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्याच्या आरोग्य विभागाच्या गुणवत्तापूर्ण सेवेची छाप उमटविली आहे.
जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, दर्जेदार आणि लोकाभिमुख करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली NQAS कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. आरोग्य संस्थांमधील पायाभूत सुविधा, स्वच्छता, औषधसाठा, वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता, रुग्ण सुरक्षा, सेवा व्यवस्थापन आणि रुग्णांशी संवाद या विविध बाबींमध्ये सातत्याने सुधारणा करण्यात आल्या. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून जिल्ह्यातील १० आरोग्य संस्थांनी गुणवत्ता मानांकनाच्या प्रक्रियेत यश मिळविले आहे.
या १० आरोग्य संस्थांचा होणार गौरव
१) प्राथमिक आरोग्य केंद्र, मसोड (ता. कळमनुरी) — ८४.९७ टक्के
२) प्राथमिक आरोग्य केंद्र, डोंगरकडा (ता. कळमनुरी) — ८४.६४ टक्के
३) प्राथमिक आरोग्य केंद्र, फाळेगाव (ता. हिंगोली) — ८४.५९ टक्के
४) प्राथमिक आरोग्य केंद्र, पांगराशिंदे (ता. वसमत) — ८२.३६ टक्के
५) प्राथमिक आरोग्य केंद्र, गोरेगाव (ता. सेनगाव) — ७८.९३ टक्के
६) प्राथमिक आरोग्य केंद्र, पोत्रा (ता. कळमनुरी) — ७२.६६ टक्के
७) आरोग्य वर्धिनी उपकेंद्र, सोमठाणा (ता. वसमत) — ९३.०१ टक्के
८) आरोग्य वर्धिनी उपकेंद्र, बासंबा (ता. हिंगोली) — ८२.६२ टक्के
९) आरोग्य वर्धिनी उपकेंद्र, पेडगाव (ता. हिंगोली) — ८२.६२ टक्के
१०) महिला रुग्णालय, वसमत — ७४.०० टक्के
या सर्व संस्थांमध्ये आरोग्य वर्धिनी उपकेंद्र सोमठाणा यांनी ९३.०१ टक्के गुण मिळवत सर्वाधिक गुणांची नोंद केली आहे. त्यामुळे सोमठाणा उपकेंद्राची कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली आहे.
गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेसाठी कठोर निकष
NQAS प्रमाणीकरण मिळविण्यासाठी आरोग्य संस्थांना विविध कठोर गुणवत्ता निकषांची पूर्तता करावी लागते. यामध्ये रुग्णालय व परिसराची स्वच्छता, वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता व कार्यक्षमता, आवश्यक औषधांचा नियमित पुरवठा, रुग्णांना मिळणाऱ्या सेवांची गुणवत्ता, रुग्णांशी प्रभावी संवाद, संसर्ग नियंत्रण, रुग्ण सुरक्षा तसेच सेवा व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे.
हिंगोली जिल्ह्यातील या १० आरोग्य संस्थांनी या निकषांवर समाधानकारक व उल्लेखनीय कामगिरी बजावत गुणवत्ता मानांकन प्राप्त केले आहे. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार आणि लोकाभिमुख आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.
स्वातंत्र्यदिनी होणार विशेष सन्मान
१५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात या सर्व १० आरोग्य संस्थांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत सार्वजनिकरित्या होणारा हा सन्मान आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
NQAS मानांकनामुळे जिल्ह्यातील आरोग्य संस्थांच्या कामकाजात गुणवत्ता, शिस्त आणि रुग्णकेंद्री दृष्टिकोन अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे. या यशामुळे जिल्ह्यातील इतर आरोग्य संस्थांनाही गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रेरणा मिळणार असून, भविष्यात आणखी आरोग्य संस्थांनी NQAS मानांकन मिळवावे, यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
“या यशामुळे जिल्ह्यातील इतर आरोग्य केंद्रांनाही अधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रेरणा मिळेल. रुग्णांना सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे आरोग्य विभागाचे प्रमुख उद्दिष्ट आहे,” असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी व्यक्त केला.
हिंगोली जिल्ह्यातील १० आरोग्य संस्थांनी मिळविलेले हे यश केवळ मानांकनापुरते मर्यादित नसून, ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने