ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण व लोककेंद्रित करण्यावर भर
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली, दि. २६ : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोककेंद्रित करण्याच्या उद्देशाने सेनगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कापडशिंगी येथे ‘सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा’ (Comprehensive Primary Health Care – CPHC) अंतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमात ग्रामीण भागात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राथमिक आरोग्य सेवेच्या विविध घटकांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. आयुष्मान आरोग्य मंदिर-उपकेंद्रांच्या माध्यमातून आरोग्य सेवा गावपातळीवर अधिक प्रभावीपणे पोहोचविणे, नागरिकांना वेळेवर उपचार उपलब्ध करून देणे तसेच प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनात्मक आरोग्य सेवांना गती देणे, हा प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे.
या वेळी जिल्हा प्रशिक्षण संघाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा महाले, जनरल फिजिशियन डॉ. नारायण भालेराव, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामहरी बेले, तसेच जिल्हा प्रशिक्षण संघाच्या शाखा सदस्य शोभा पवार, ज्योती बांगर आणि नंदा चव्हाण यांनी प्रमुख मार्गदर्शक व प्रशिक्षक म्हणून उपस्थित राहून आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
‘Resolve More, Refer Less’चा प्रभावी अवलंब करण्याचे आवाहन
प्रशिक्षणादरम्यान गावपातळीवरच जास्तीत जास्त आजारांचे निदान व उपचार करून अनावश्यक रुग्ण रेफरल टाळणे, म्हणजेच ‘Resolve More, Refer Less’ हे सूत्र प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन करण्यात आले.
आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळाल्यास ग्रामीण आरोग्य व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल घडवून आणता येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. माता मृत्यू व बाल मृत्यू दर शून्यावर आणणे, क्षयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह व कर्करोगाचे वेळेत स्क्रिनिंग करणे, तसेच नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवून गृहभेटी, आरोग्य तपासणी आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यावर विशेष भर देण्यात आला.
CPHC अंतर्गत १३ प्रमुख आरोग्य घटकांवर मार्गदर्शन
प्रशिक्षण सत्रामध्ये सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवेच्या १३ प्रमुख घटकांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये—
१. गरोदरपण, प्रसूती व प्रसूतीपश्चात काळजी : गरोदर महिलांची वेळेवर नोंदणी, नियमित तपासणी, सुरक्षित संस्थात्मक प्रसूती आणि प्रसूतीनंतर माता व नवजात बालकांची योग्य काळजी.
२. नवजात व अर्भक आरोग्य सेवा : जन्मानंतरची तत्काळ काळजी, जन्मानंतर लवकर स्तनपान, लसीकरण तसेच कुपोषण व संसर्गजन्य आजारांचे नियंत्रण.
३. बालक व किशोरवयीन आरोग्य : बालकांची वाढ व विकासाचे नियमित निरीक्षण, पोषण सुधारणा आणि किशोरवयीन आरोग्य समस्यांबाबत मार्गदर्शन.
४. कुटुंब नियोजन व प्रजनन आरोग्य : सुरक्षित मातृत्वासाठी कुटुंब नियोजनाच्या साधनांची उपलब्धता, समुपदेशन आणि प्रजनन मार्गातील संसर्ग व लैंगिक संक्रमणांवरील उपचार.
५. संसर्गजन्य आजारांचे व्यवस्थापन : क्षयरोग, मलेरिया, डेंग्यू, एचआयव्ही यांसारख्या आजारांचे सक्रिय स्क्रिनिंग, वेळेवर उपचार आणि आवश्यक सर्वेक्षण.
६. सामान्य व किरकोळ आजारांवर उपचार : ताप, सर्दी, खोकला, अतिसार यांसारख्या सामान्य आजारांवर स्थानिक पातळीवर मानक उपचार पद्धतीनुसार सेवा उपलब्ध करून देणे.
७. असंसर्गजन्य आजारांचे नियंत्रण : मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि कर्करोग यांचे नियमित स्क्रिनिंग तसेच निरोगी जीवनशैलीचा प्रसार.
८. डोळे व कान यांचे प्राथमिक आरोग्य : दृष्टीदोष, मोतीबिंदू आणि श्रवणदोषांचे प्राथमिक टप्प्यात निदान करून आवश्यक उपचार व संदर्भ सेवा उपलब्ध करून देणे.
९. मौखिक आरोग्य : दातांची स्वच्छता, मुखाच्या कर्करोगाची प्राथमिक तपासणी आणि तंबाखूमुक्तीसाठी जनजागृती.
१०. वृद्धापकाळ व पॅलिएटिव्ह केअर : ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य समस्यांचे नियमित व्यवस्थापन आणि असाध्य आजारांनी ग्रस्त रुग्णांना वैद्यकीय, मानसिक व सामाजिक आधार.
११. आपत्कालीन वैद्यकीय सेवा : अपघात, हृदयविकार, श्वसनाच्या समस्या आदी आपत्कालीन परिस्थितींमध्ये तातडीने प्राथमिक उपचार देणे आणि रुग्णवाहिका यंत्रणा प्रभावी करणे.
१२. मानसिक आरोग्य सेवा : नैराश्य, ताणतणाव आणि व्यसनाधीनता यांची प्राथमिक पातळीवर ओळख, समुपदेशन व आवश्यक मार्गदर्शन.
१३. योग व आयुष पद्धती : निरोगी जीवनशैलीसाठी योग, आयुर्वेद व होमिओपॅथीचा पूरक आरोग्य पद्धती म्हणून योग्य वापर व प्रसार.
रुग्णस्नेही आरोग्य सेवेसाठी संवाद कौशल्यावर भर
आरोग्य सेवा केवळ उपचारांपुरती मर्यादित न ठेवता ती रुग्णस्नेही, संवेदनशील आणि लोककेंद्रित करण्यासाठी संवाद कौशल्य, सकारात्मक देहबोली आणि प्रभावी नेतृत्वगुणांचा वापर करण्यावरही प्रशिक्षणात भर देण्यात आला. आरोग्य कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांशी विश्वासाचे नाते निर्माण करून त्यांच्या आरोग्यविषयक गरजा समजून घेणे आणि त्यानुसार सेवा देणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमास समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, गटप्रवर्तक आणि आशा कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षणामुळे गावपातळीवरील आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढून नागरिकांना त्यांच्या परिसरातच अधिकाधिक आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा