औंढा नागनाथ येथे श्रावण सोमवारनिमित्त तगडा पोलीस बंदोबस्त; क्यूआर कोडसह ड्रोन कॅमेऱ्याची नजर
पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
16 ऑगस्ट 2026
औंढा नागनाथ : हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिरात श्रावण सोमवारनिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी दाखल होण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन मिळावे, तसेच गर्दीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मंदिर परिसरासह शहरातील प्रमुख ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.
पोलीस अधीक्षक श्रनिक लोढा, पोलीस उपविभागीय अधिकारी वाघ, ग्रामीण वसमतचे राजकुमार केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच औंढा नागनाथचे पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.
शंभर पोलीस, शंभर होमगार्ड; २४ अधिकारी तैनात
श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर सुमारे १०० पोलीस कर्मचारी, १०० होमगार्ड आणि २४ पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. त्याचबरोबर आरसीपीची एक प्लाटूनही बंदोबस्तामध्ये सहभागी राहणार आहे. एसआरपीएफच्या दोन तुकड्या अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध ठेवण्यात आले असून, गर्दीच्या ठिकाणी परिस्थितीनुसार बंदोबस्त वाढविण्याची तयारी पोलीस प्रशासनाने ठेवली आहे.
याशिवाय बंदोबस्तामध्ये १५ पोलीस पाटलांचाही सहभाग राहणार असून, मंदिर परिसर, भाविकांची गर्दी आणि ग्रामीण भागातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांची मदत घेतली जाणार आहे.
क्यूआर कोडद्वारे पोलिसांना बंदोबस्ताची माहिती
बंदोबस्ताचे नियोजन अधिक प्रभावी करण्यासाठी क्यूआर कोडचा वापर करण्यात येणार आहे. बंदोबस्तावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्तीचे ठिकाण, आवश्यक सूचना आणि इतर महत्त्वाची माहिती क्यूआर कोडच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे पोलिसांना आवश्यक माहिती तातडीने मिळून बंदोबस्तामध्ये अधिक समन्वय राखणे शक्य होणार आहे.
ड्रोन कॅमेऱ्याची मंदिर परिसरावर नजर
भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच मंदिर परिसरातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखरेख करण्यात येणार आहे. गर्दी वाढलेल्या ठिकाणांची माहिती घेणे, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे आणि वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला जाणार आहे.
भाविकांना रांगेतून सुलभ दर्शन
श्रावण सोमवारनिमित्त मंदिरात होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन भाविकांना रांगेतून शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेता यावे, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. गर्दीचे नियमन, भाविकांची सुरक्षितता आणि मंदिर परिसरातील शिस्त राखण्यासाठी पोलीस कर्मचारी विविध ठिकाणी तैनात राहणार आहेत.
पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था
दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक वाहनांमधून येणार असल्याने वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, तसेच भाविकांच्या ये-जा मार्गात अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी वाहतूक व्यवस्थेवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
आरोग्य पथकासह महसूल विभागाचीही मदत
लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता आरोग्य पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. गर्दीमध्ये कोणत्याही भाविकाला आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यास तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी आरोग्य विभागाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महसूल विभागाच्या वतीनेही कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, गर्दी व्यवस्थापन आणि प्रशासकीय समन्वयामध्ये त्यांची मदत घेतली जाणार आहे.
अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलिसांची करडी नजर
श्रावण सोमवारच्या दिवशी मंदिर परिसरात होणारी गर्दी लक्षात घेता चोरी, छेडछाड, संशयास्पद हालचाली तसेच इतर अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी साध्या वेशातील तसेच गणवेशातील पोलिसांचीही नजर राहणार आहे. गर्दीचा फायदा घेऊन गैरप्रकार करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत ११२ वर संपर्काचे आवाहन
दरम्यान, कोणतीही अनुचित घटना, संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल तसेच आपत्कालीन परिस्थिती निदर्शनास आल्यास नागरिक व भाविकांनी तातडीने ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
श्रावण सोमवारनिमित्त लाखो भाविक औंढा नागनाथ येथे दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस, होमगार्ड, आरसीपी, एसआरपीएफ, आरोग्य विभाग आणि महसूल विभागाची यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. भाविकांना कोणतीही अडचण न येता सुरक्षित व सुलभ दर्शन मिळावे, यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा