हिंगोली पोलिसांची विशेष मोहीम; ३५ गहाळ मोबाईल मुळ मालकांना परत७ लाख ७० हजार रुपयांचे मोबाईल जिल्ह्यासह परजिल्हा व परराज्यातून हस्तगत

हिंगोली पोलिसांची विशेष मोहीम; ३५ गहाळ मोबाईल मुळ मालकांना परत
७ लाख ७० हजार रुपयांचे मोबाईल जिल्ह्यासह परजिल्हा व परराज्यातून हस्तगत

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
  १८ ऑगस्ट २०२६ 
हिंगोली : नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल शोधून ते त्यांच्या मुळ मालकांना परत मिळवून देण्यासाठी हिंगोली शहर पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक श्री. श्रेणिक लोढा (भापोसे) यांनी दिलेल्या सूचनांनुसार राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण ३५ अँड्रॉईड मोबाईल फोन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे ७ लाख ७० हजार रुपये आहे.
हिंगोली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल हिंगोली जिल्ह्यातून, इतर जिल्ह्यांतून तसेच परराज्यांतून तांत्रिक तपासाच्या आधारे शोधून काढण्यात आले. हस्तगत करण्यात आलेले हे मोबाईल आज पोलीस अधीक्षक श्री. श्रेणिक लोढा (भापोसे) यांच्या हस्ते मुळ मालकांना परत करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्री. कमलेश मीना यांचे मार्गदर्शन लाभले.
CEIR पोर्टलवर तात्काळ माहिती भरण्याचे आवाहन
मोबाईल फोन हरवल्यानंतर नागरिकांनी वेळ न दवडता स्वतः किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलवर मोबाईलची माहिती नोंदवावी, असे आवाहन हिंगोली शहर पोलिसांनी केले आहे. मोबाईलचा IMEI क्रमांक, बिल-पावती व इतर आवश्यक माहिती उपलब्ध असल्यास शोध प्रक्रियेस मोठी मदत होते.
तसेच नागरिकांनी बिल-पावतीशिवाय सेकंड-हँड मोबाईल खरेदी करू नये अथवा वापरू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. संशयास्पद किंवा विनाबिल मोबाईल खरेदी केल्यास त्याचा संबंध चोरी अथवा गुन्ह्याशी असल्याचे निष्पन्न होऊ शकते. त्यामुळे सेकंड-हँड मोबाईल खरेदी करताना त्याची योग्य कागदपत्रे व वैधता तपासणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
पोलिसांच्या तांत्रिक तपासामुळे यश
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रेणिक लोढा (भापोसे), अप्पर पोलीस अधीक्षक श्री. कमलेश मीना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नारायण देशमुख, हिंगोली शहर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलीस निरीक्षक श्री. देवेंद्रसिंग ठाकूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दीपक मस्के तसेच पोलीस अंमलदार सुनील अंभोरे, गणेश लेकुळे, निलेश ढाले, मोसीन पठाण, दिलीप लेकुळे आणि सायबर सेलचे दत्ता नागरे यांनी मोबाईल शोधून हस्तगत करण्याच्या मोहिमेत महत्त्वाची कामगिरी बजावली.
गहाळ मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी हिंगोली शहर पोलिसांचे आभार व्यक्त केले असून, पोलिसांच्या या विशेष मोहिमेमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने